अहमदनगर Live24 टीम, 13 फेब्रुवारी 2021:-आपल्या मतदार संघाच्या विकासासाठी नेहमीच अग्रेसर असणारे कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या जामखेडच्या वैभवात आता भर पडणार आहे.
आमदार पवार यांच्या संकल्पनेतून शहरातील विंचरणा नदीच्या काठावर भगवान श्री नागेश्वर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमा अंतर्गत दि 14 व 15 रोजी भव्य अशी भगवान शंकराची मुर्ती बसवण्यात येणार आहे.
नगरचे प्रसिद्ध शिल्पकार प्रमोद कांबळे यांनी हे शिल्प तयार केले आहे. आमदार रोहित पवार यांनी व त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांनी स्वच्छ सर्वेक्षण माध्यमातून जामखेड शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा विडा उचलला आहे.
त्यामुळे शहरात बदल होताना दिसत येत आहे. त्यातच शहरातील धाकटी नदी व विंचरणा नदीचे सुशोभिकीकरण सुरू आहे. याच अनुषंगाने जामखेड शहराचे ग्रामदैवत श्री नागेश्वर मंदिराच्या धर्तीवर शहरातील विंचरणा नदीच्या काठावर भव्य अशी 21 फुट उंच शंकराची मुर्ती बसवण्यात येणार आहे.
तसेच या ठिकाणी बागबगीचा देखील करण्यात येणार आहे. सदर शिल्प तयार करण्याचे काम सहा महीन्यांपासून सुरू होते. तर शिल्प ठेवण्याचा कठाडा हा वीस दिवसात कर्नाटक येथील कामगारांनी तयार केला आहे.
आमदार रोहित पवार यांच्या संकल्पनेतून जामखेड शहर हे प्रेक्षणीय स्थळ व्हावे यासाठी ही मुर्ती बसवण्यात येणार आहे. तसेच येणार्या प्रत्येक भाविकांना त्या शिल्पा सोबत सेल्फी काढता येणार आहे.