अहमदनगर Live24 टीम, 06 जानेवारी 2022 :- देशासह राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. रुग्णसंख्या वाढीचा धोका लक्षात घेत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यामध्ये आज कोरोना संदर्भात आढावा बैठक झाली आहे.
या बैठकीत कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठीच्या उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीमध्ये आरोग्यमंत्री टोपे म्हणाले की, अलीकडे मुंबईमध्ये कोरोना रुग्णाची संख्या झपाट्याने वाढत आहे.
परंतु अद्याप तरी मुंबई लोकल बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही. तसेच मुंबईतील काही प्रमाणात शाळा, कॉलेज बंद करण्यात आली आहे.
परंतु या दोन दिवसात शाळा, कॉलेज बंद केल्यानंतर शालेय विद्यार्थी हॉटेल, मॉल मध्ये फिरताना दिसून आले आहेत. जर शाळा बंद केल्याने विद्यार्थी हॉटेल, मॉलमध्ये फिरत असतील तर याबाबत कडक पाऊले उचलावी लागतील.
दरम्यान रुग्णसंख्या वाढत असल्याने लॉकडाउन होणार की काय असा प्रश्न सर्वांना पडला आहे. याबाबत देखील टोपे यांनी माहिती दिली आहे. लॉकडाउन बद्दल विचारलेल्या प्रश्नावर टोपे म्हणाले की, सध्यातरी जिल्हाअंतर्गत बंदी घालण्याची काही आवश्यकता वाटत नाही.
परंतु विकेंड लॉकडाऊन संदर्भात येत्या दोन दिवसात जी काही कोरोनाची परिस्थिती असेल त्या परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घेतला जाईल.
तसेच कोरोनाचा होणारा प्रादुभाव रोखण्यासाठी राज्यात विविध मेळावे किंवा जास्त लोक एकत्र येत असलेल्या कार्यक्रमावर निर्बंध घालून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देखील टोपे यांनी यावेळी दिला.