अहमदनगर Live24 टीम, 15 ऑगस्ट 2021 :- कोरोनामुळे देशाची तसेच आपणा सर्वांचीच आर्थिक परिस्थिती कोलमडली. अनेकांनी आपल्या कुटुंबातील व जवळपासची माणसं कायमची गमाली अनेक दुःखद प्रसंग या दोन वर्षात अनेकांवर ओढवले असले तरी त्यावर आपण मात करून पुढे जाऊ.
परंतु विद्यार्थ्यांचे मात्र मोठे शैक्षणिक नुकसान या कोरोनामुळे झाले. आता विद्यार्थ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लस देण्याचे नियोजन करण्याची गरज आहे. त्यांचे शालेय नुकसान होणार नाही याची खबरदारी प्रशासन सरकारने घेतली पाहिजे असे प्रतिपादन आमदार मोनिका राजळे यांनी केले आहे.
तिसगाव येथे दहावी व बारावी परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आमदार राजळे यांच्या हस्ते तिसगावचे सरपंच काशिनाथ पाटील लवांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
यावेळी सीबीएससीमध्ये नवोदय विद्यालय, टाकळी ढोकेश्वर येथे दहावीत प्रथम आलेल्या सादिया ताहेर शेख या विद्यार्थिनीसह श्री वृद्धेश्वर विद्यालयात दहावी व बारावी प्रथम आलेल्या विद्यार्थिनी अनिशा दीपक भापसे दहावीत प्रथम, सानिका संदीप थोरात बारावी विज्ञान शाखेत प्रथम, अंजली गणेश खोमणे बारावी कला शाखेत प्रथम,तेजस्वी राजेंद्र खंडागळे यांच्यासह सैन्यदलात भरती झालेला नवाज शेख या तरुणाचा सन्मान करण्यात आला.
आमदार राजळे म्हणाल्या, विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान पाहता माणिकदौंडी सारख्या डोंगर भागात मोबाइलला रेंज मिळत नाही. अशावेळी त्या भागातील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घेता येत नसल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.
अशी परिस्थिती निर्माण होत असल्याने आता विद्यार्थ्यांना लस देण्याची गरज आहे. प्रत्येक मुलगा हुशार असू शकतो असे नाही पालकांनीही त्याचे गुण ओळखून त्याच्यावर दडपण न आणता शिक्षण आणि संस्काराची सांगड घालून एकमेकाला विश्वासात घेऊन पुढे जाण्याची गरज आहे.