Maharashtra news:राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत. काल रात्री त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली.
मात्र, आज सकाळी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतल्याने वेगळी चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्र्यांना भेटणे वेगळे आणि पक्षाच्या अध्यक्षांना भेटणे वेगळे. यावरून आता चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय मंत्र्यांना भेटणे शिष्टाचाराचा भाग आहे. पक्षाच्या अध्यक्षांच्या भेटी पक्षीय पातळीवरच व्हायला हव्यात. मुख्यमंत्री शिंदे शिवसेनेचे आहेत. भाजपसेनेचे सरकार असेल तर शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या भेटी अपेक्षित आहेत. मुख्यमंत्र्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेणे योग्य ठरत नाही, अशी टीका सोशल मीडियातून सुरू झाली आहे.
मात्र, या भेटीतून शिंदे गट आणि भाजपची झालेली जवळीक दिसून येते. याशिवाय या दौऱ्यात शिंदे आणि फडणवीस यांनी कायदेशीर लढाईसाठीही तयारी केली आहे. यासाठी त्यांची सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्यासोबतही बैठक होणार आहे. ११ जुलै रोजी सुप्रिम कोर्टात होणाऱ्या सुनावणीसंबंधी यामध्ये चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येते.