मुंबई : शिवसेनेच्या बंडखोर नेत्यांना ‘गद्दार’ असा उल्लेख करत शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांना बंडखोरांवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे यांनी आज ज्येष्ठ शिवसेना नेते आणि खासदार गजानन कीर्तीकर यांची गोरेगाव येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना शिंदे यांना आदित्य ठाकरेंनी केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे.
“शिवसेनेचे बंडखोर हे गद्दार आहेत. त्यांच्या रक्तात शिवसेना नाहीय,” असे आदित्य म्हणाले असल्याचे सांगत पत्रकारांनी शिंदे यांना यावर प्रतिक्रिया विचारली. त्यावर “त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या. आम्ही आमचं काम करतोय,” असे उत्तर एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
“आम्ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना पुढे नेण्याचे काम करतोय. महाराष्ट्रातील जनतेला आमची भूमिका पटलेली आहे. म्हणूनच आमच्यासोबत ५० आमदार लोकसभेच्या १२ खासदारांनी या भूमिकेचे समर्थन केले आहे. यावरुन आपल्याला कल्पना आली पाहिजे की जी भूमिका आणि विचार बाळासाहेबांची होते ते आम्ही आत्मसात केलेत. आमच्याकडे बहुमत असल्याचे अधोरेखित करत एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.