अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- टाळेबंदीचा गैरफायदा घेऊन अरणगाव रोड, महापालिका हद्दीतील इंदिरानगर भागात सुरु असलेले अनाधिकृत मोबाईल टॉवर उभारणीचे काम सुरु आहे.
सदर काम सुट्टीच्या दिवसाचा फायदा घेऊन होत असताना तातडीने मोबाईल टॉवर उभारणीचे काम बंद होण्यासाठी स्थानिक नागरिकांनी रविवारी महापालिका आयुक्त शंकर गोरे यांचे निवासस्थानी जाऊन आंदोलन केले.
या आंदोलनात जालिंदर चोभे मास्तर, नामदेव चव्हाण, सुनिल गायकवाड, तय्यब तांबोली, भाऊसाहेब दाते, सागर शिंदे, शुभम धामणे, बाबू गायकवाड, चंद्रकांत बिरारे, गोरख जाधव आदी उपस्थित होते. अनाधिकृत मोबाईल टॉवर उभारणीचे काम करणार्या
जागा मालकाने महापालिकेकडून बिगर निवासी तळ मजल्यासाठी बांधकाम परवाना घेतला आहे. मात्र या बांधकामाच्या परवान्यावर मोबाईल टॉवर उभारणीचे काम सुरु असून, फाऊंडेशनचे काम करण्यात आले आहे.
महापालिकेकडे सदर काम बंद करण्याची तक्रार करुन देखील महापालिका प्रशासन डोळेझाक करत असल्याने स्थानिक नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. जिल्हा परिषद शाळे समोर लोकवस्तीत हा टॉवर उभारण्यात येत आहे.
नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याच्या भितीने स्थानिक नागरिकांनी या मोबाईल टॉवरला विरोध दर्शवला आहे. महापालिकेने या मागे केलेल्या तक्रारीवरुन सात दिवसासाठी सदर कामास स्थगिती दिली होती. मात्र नंतर पुन्हा सुट्टीचा दिवस साधून टॉवर उभारणीचे काम केले जात आहे.
महापालिकेने सदर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन अनाधिकृत मोबाईल टॉवरचे काम बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. आयुक्त गोरे यांनी आंदोलकांचे निवेदन स्विकारुन सोमवारी (दि.31 मे) सकाळी महापालिकेत सदर प्रश्नी बैठकिला बोलवले आहे.
नागरिक मोबाईल टॉवरचे काम होऊ देणार नसल्याच्या भूमिकेत असून, जागा मालक व स्थानिक नागरिकांमध्ये वाद चिघळण्याची शक्यता आहे. मोबाईल टॉवरचे काम बंद न झाल्यास नागरिकांनी नगर-दौंड महामार्गावर रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे.