अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व मंदिरे बंद आहेत. मात्र नेवासा तालुक्यातील वरखेडच्या लक्ष्मीमाता मंदिर परिसरात भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
याबाबत माहिती मिळताच पोलिस आल्याने भाविकांसह दुकानदारांची धावपळ झाली. कोविड नियमांची पायमल्ली करत व सर्व नियम मोडत भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
भाविकांच्या गर्दीमुळे गावाला अक्षरश: यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. नेवाशाचे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा व पोलीस निरीक्षक विजय करे यांना वरखेड येथे श्रीमहालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याचे समजताच ते फौजफाट्यासह तेथे दाखल झाले.
पोलिसांना पाहताच दुकानदारांनी आपले चंबूगबाळ उचलून घेतले. तर दर्शनासाठी जमलेल्या भाविकांनीही लगेच काढता पाय घेतला.मात्र पोलीस निरीक्षक करे यांनी तेथेच तळ ठोकत सर्व दुकाने तेथून हटवण्यास सांगितले.