अहमदनगर Live24 टीम, 8 ऑगस्ट 2021 :- नगर जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढणारी रुग्णसंख्या नगरसह आजूबाजूच्या जिल्ह्यासाठी धोकादायक ठरत आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या जिल्हा प्रशासनान अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
तो म्हणजे नगर जिल्ह्यातून येणाऱ्यांसाठी थर्मल स्क्रिनिंग बंधनकारक केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्हा राज्यात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला आहे. त्यामुळे अन्य जिल्ह्यांमधील निर्बंध शिथील केले असताना नगर जिल्ह्यात मात्र निर्बंध जैसे थे आहेत.
पश्चिम महाराष्ट्रासह शेजारील अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाची वाढती रुग्णसंख्या तिसऱ्या लाटेचे संकेत देणारी आहे. तर नाशिकच्या दारापर्यंत कोरोनाची तिसरी लाट येऊन ठेपली आहे. त्यादृष्टीने नाशिक जिल्ह्याधिकाऱ्यांनी नगर जिल्ह्यातून येणाऱ्यांसाठी थर्मल स्क्रिनिंग बंधनकारक केलं आहे.
अहमदनगरमधून येणाऱ्या प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात येणार आहे. करोनाला अटकाव करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सिन्नरमध्ये करोनाबाधितांची संख्या वाढत असल्यामागे अहमदनगर कनेक्शन कारणीभूत ठरत असल्याचा दावा आरोग्य यंत्रणेने केला आहे.
सिन्नर तालुक्यातील रहिवाशांचे बहुतांश व्यवहार संगमेनरमध्ये चालतात. वावी आणि शहा येथील रहिवाशांचे देखील शिर्डी, कोपरगाव, लोणी या भागात कामानिमित्त येणे जाणे असते. त्यामुळे नाशिक जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.