मुळा पाणलोट क्षेत्रात ढगफुटीसदृश्य पाऊस, धरणात ४१ हजार ६०० क्युसेकने पाण्याची आवक, मुळा धरण ७५ टक्के भरले !

Ahmednagarlive24 office
Published:
mula dam

मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने रविवारी (४ ऑगस्ट) दुपारी १२ वाजता तब्बल ४१ हजार ६०० क्युसेकने नवीन पाण्याची आवक सुरू होती. कोतुळकडील मुळा नदीला महापूर आला असून, पुढील ३६ तासांत धरणात झपाट्याने पाण्याची आवक होणार असल्याने धरणातील पाणीसाठा वाढणार आहे. पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी जलसंपदा विभागाचा पूर नियंत्रण कक्ष एकंदरीत स्थितीकडे लक्ष देण्यासाठी सज्ज झाला आहे.

मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दोन दिवसांपासून तुफान पर्जन्यवृष्टी होत आहे. मुळा नदीकडे होणारी २० हजार क्युसेकने आवक रविवारी सकाळी वाढून २३ हजार क्युसेक झाली होती. नंतर त्यात वाढ होऊन सकाळी नऊ वाजता ३४ हजार ३९६ क्युसेक वाढ झाली. त्यात दुपारी १२ वाजता कोतुळकडील मुळा नदीला सहा मीटरने तब्बल ४१ हजार ६०० क्युसेकने आवक सुरू असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.

गेल्या काही वर्षात ही विक्रमी आवक मानली जात असून पुढील ३६ तासांत धरणात झपाट्याने पाणीसाठा जमा होणार आहे. दुपारी १२ वाजता मुळा धरणातील पाणीसाठा सुमारे १९ हजार दशलक्ष घनफूट इतका झाला असून, तो ७५ टक्क्यांवर पोहोचला होता.

मुळा धरणाकडील पाण्याची आवक पाहता, राहुरीकरांसह नगर जिल्ह्याला ८ ऑगस्ट २००६ या दिवसाची आठवण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. २००६ साली मुळा धरणाकडे अशाच पद्धतीने पाण्याची आवक झाली होती. धरणाच्या पाणलोटात तुफान पर्जन्यवृष्टी सातत्याने होत असल्याने मुळा धरणातून नदीपात्रात २ ऑगस्ट २००६ ला पाणी सोडावे लागले.

६ ऑगस्ट २००६ रोजी धरणातून जायकवाडीकडे तब्बल ४५ हजार क्युसेकने पाणी सोडावे लागले होते. त्यावेळी नगर, नाशिक जिल्ह्यातील सर्वच धरणातील पाण्याचा विसर्ग जायकवाडीकडे झेपावत होता. या सर्वच धरणातून पाणी सोडताना जलसंपदा विभागाच्या तत्कालीन अधिकारी, कर्मचारी, पूरनियंत्रण कक्षाने मोलाची कामगिरी बजावली होती. आजही तो दिवस आठवल्यास लाभक्षेत्रातील नागरिकांच्या अंगावर शहारे येतात.

बहुदा गेल्या १० ते १५ वषर्षांपेक्षा अधिक काळाने प्रथमच मुळा नदीकडे ४० हजार क्युसेकपेक्षा अधिक पाण्याची आवक होत आहे. कोतुळ येथील जलमापन केंद्रावर २००६ मध्ये ६ मीटरला ४० हजार ८२० इतकी जलमापनाची पट्टी होती. त्या पट्टीवरून त्यावेळी पाणी वाहिले होते. नंतर लहित खुर्द या ठिकाणी हे जलमापन केंद्र हलवण्यात आले.

आज या जलमापन केंद्रावर ६ मीटरहून अधिक पाण्याची आवक झाल्याची नोंद झाली आहे. जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता सायली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अभियंता व्ही. डी. पाटील, शाखा अभियंता आर. जे. पारखे यांच्यातील देखरेखीखाली घरणाचे पूरनियंत्रण पातळीचा स्टाफ धरणाच्या पाणीपातळीकडे लक्ष देऊन आहे. पाण्याची आवक अशीच राहिल्यास तीन ते चार दिवसांत मुळा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची चिन्ह दिसत आहे. दरम्यान, मुळा धरणातील पाणीसाठा पाहण्यासाठी पर्यटकांची मुळा धरणाकडे गर्दी वाढली आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe