ताज्या बातम्या

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक! ‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची उर्वरित 25% रक्कम वर्ग

अहमदनगर Live24 टीम, 27 मार्च 2022 Krushi news :- खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यातील जवळपास सर्वच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. खरिपात झालेल्या अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्याचे (Latur) देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

जिल्ह्याच्या खरिपातील (Kharip Season) मुख्य पिक सोयाबीन (Soybean) समवेतच जवळपास सर्व पिके अतिवृष्टीमुळे (Heavy rain) क्षतीग्रस्त झाली होती.

ऐन खरीप हंगामातील पिके अंतिम टप्प्यात असताना पिकाची नासाडी झाल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास वाया गेला. लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे देखील खरीप हंगामात मोठे नुकसान झाले होते या अनुषंगाने शासनाने तात्काळ पंचनामे देखील केले.

पंचनामे झाले, पीक पाहणी झाली आणि मायबाप शासनाने (Government) शेतकऱ्यांसाठी नुकसान भरपाईची घोषणा केली. नुकसान भरपाईची (Compensation) घोषणा झाल्यानंतर मायबाप शासनाने नुकसान भरपाईची 75 टक्के रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यावर दीपावली दरम्यान वर्ग केली.

मात्र 25 टक्के रक्कम त्यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली नव्हती. शेतकऱ्यांना 25 टक्के रक्कम प्राप्त करण्यासाठी जवळपास पाच महिन्यांच्या कालावधीपर्यंत प्रतिक्षा बघावी लागली.

आता, जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर उर्वरित 25 टक्के रक्कम जमा केली जाऊ लागली आहे. या प्रक्रियेस थोडा उशीर जरी झाला तरी देखील शेतकऱ्यांसाठी ही नक्कीच दिलासादायक बाब आहे. जिल्ह्यातील निलंगा तालुक्याच्या सुमारे 77 हजार शेतकऱ्यांना आता उर्वरित 25 टक्के नुकसान भरपाईची रक्कम दिली गेली आहे.

या 77 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जवळपास आठ कोटी 29 लाख रुपये वर्ग करण्यात आले आहेत. मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, निलंगा तालुक्यात खरिपात झालेल्या अतिवृष्टीमुळे अधिकचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आले.

तालुक्यात मांजरा आणि तेरणा नदी वाहते त्यामुळे अतिरुष्टी दरम्यान या नदीचे दरवाजे उघडण्यात आले होते. परिणामी अतिवृष्टी मुळे आधीच बेजार झालेल्या पिकांवर या नदीचे पाणी आल्याने संपूर्ण पीक वाहून गेले. यामुळे शेतजमिनीची माती देखील वाहिली. यामुळे सोयाबीन या मुख्य पिकासमवेतच खरीप हंगामातील सर्वच पिके मातीमोल झालेत.

महसूल विभागाच्या पंचनाम्यात सुमारे 75 हजार हेक्‍टर क्षेत्र बाधित झाल्याचे स्पष्ट करण्यात आले. यानुसार सरकारने दोन हेक्‍टर क्षेत्राच्या आत कोरडवाहू क्षेत्रासाठी हेक्टरी 10,000; बागायती क्षेत्रासाठी हेक्टरी 18,000 आणि फळबागांसाठी हेक्‍टरी 25,000 नुकसान भरपाई देण्याची घोषणा केली.

यामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान भरून निघणार नाही मात्र शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळणार एवढे नक्की. नुकसान भरपाई झालेल्या शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात 54 कोटी रुपये देण्यात आले होते. परंतु दुसऱ्या टप्प्यातील रक्कम येण्यास खूप उशीर लागला. नुकत्याच काही दिवसांपूर्वी मायबाप शासनाने प्रशासनाकडे उर्वरित रक्कम सुपूर्द केली होती.

त्या अनुषंगाने प्रशासनाने संबंधित शेतकऱ्यांची माहिती संकलित करून उर्वरित 25 टक्के रक्कम खात्यावर वर्ग करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यापासून मुहूर्तमेढ रोवली गेली आहे. जिल्ह्यातील अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लवकरच नुकसान भरपाईची उर्वरित रक्कम अदा केली जाणार आहे.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts