दिलासादायक ! जिल्ह्यातील हे धरण झाले ओव्हरफ्लो

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :-मुळा पाणलोटातील हरिश्चंद्र गड, आंबितमध्ये मान्सून हजेरी लावली असल्याने मुळा नदीवर पाणी वाढल्याने आंबित पाठोपाठ 600 दलघफू क्षमतेचे पिंपळगाव खांड धरणही ओव्हरफ्लो झाले असून आता पाणी मुळा धरणाच्या दिशेने झेपावले आहे.

उत्तर नगर जिल्ह्याचे जीवनदायिनी असलेल्या मुळा आणि भंडारदरा पाणलोटात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. दहा दिवसांपूर्वी मुळा पाणलोटात जोरदार पाऊस झाल्याने आंबित धरण भरले होते.

त्यानंतर पिंपळगाव खांड धरणात पाण्याची आवक होत होती. हे धरण ओव्हरफ्लोच्या मार्गावर असतानाच, पाऊस गायब झाला. पण पाणलोटात पावसाच्या सरी जोरदार कोसळू लागल्याने 800 क्युसेकने पाणी या धरणात दाखल झाले होते.

शुक्रवारी रात्री 9.15 वाजण्याच्या सुमारास हे धरण ओव्हरफ्लो झाले. आता या धरणाच्या खाली मुळा नदी वाहती झाली असून पावसाचे प्रमाण टिकून राहिल्यास एक दोन दिवसांत मुळा धरणात हे पाणी दाखल होण्याची शक्यता आहे.

भंडारदरात धिम्या गतीने नवीन पाण्याची आवक होत आहे. या धरणातील पाणीसाठा 5299 दलघफू होता. 840 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. या धरणाजवळील 102 दलघफू क्षमतेचा तलावातील पाणीसाठा आज निम्मा होण्याची शक्यता आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts