नगर अर्बन बँकेच्या घोटाळ्याची चौकशी करून कारवाई करण्यास विलंब होत असल्याच्या निषेधार्थ ठेवीदार व सभासदांच्या वतीने बुधवारी (दि. २२) पोलिस अधीक्षक कार्यालयावर आक्रोश व आसूड मोर्चा काढण्याचा इशारा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना निवेदनाद्वारे सोमवारी देण्यात आला.
नगर अर्बन बँकेच्या घोटाळ्याची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू आहे. ही चौकशी पूर्ण करून फॉरेन्सिक अहवाल उपलब्ध करून देण्याचे आश्वासन ठेवीदार व सभासदांना पोलिसांकडून देण्यात आले होते.
परंतु, पोलिसांकडून याबाबत कुठलीही कार्यवाही झाली नाही. ठेवीदार व सभासदांनी पोलिसांना २० नॉव्हेंबरपर्यंतची मुदत दिली होती. परंतु, पोलिस प्रशासनाकडून कार्यवाही झाली नाही.
त्यामुळे ठेकेदार व सभासद पुन्हा आक्रमक झाले आहेत. त्यांनी मोटारसायकलने जाऊन पोलिस अधीक्षक कार्यालयात आसूड ओढून आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या निवेदनावर डी. एम. कुलकर्णी यांची स्वाक्षरी आहे.