अहमदनगर Live24 टीम, 23 फेब्रुवारी 2021:-शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा फैलावत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
गावपातळीवर कोरोनाचे संक्रमण वाढले असल्याने कोरोनाबाधितांची आकडेवारीत काहीशी वाढ होत आहे.
दरम्यान जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही दिवसांपासून कमी होताना दिसून येत होता.
तसेच कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत असताना नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना फैलावत आहे.
आजच्या घडीला दररोज पन्नासच्या पटीत कोरोनाचे पेशंट वाढत असून आज (मंगळवारी) दुपारपर्यंत 34 संशयितांना करोनाची बाधा झाली.
त्यांच्या संपर्कातील 200 पेक्षा अधिक रिपोर्ट पेंडिंग आहेत. त्यामुळे नगरकरांची चिंता वाढली आहे. आज सापडलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक सावेडीतील 9,
तर केडगावमधील 5 जणांचा समावेश आहे. याशिवाय भोसले आखाडा, नागापूर येथेही नव्याने करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता करोना तपासणीसाठी मनपाची 7 आरोग्य केंद्र व 35 कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तसेच मंगल कार्यालय, हॉटेल्स तपासणीसाठी चार पथकांची स्थापना केली असून मास्क, सोशल डिस्टन्सिंग तपासणीसाठी देखील खास पथके तयार करण्यात आली आहे.
कोवीडच्या काळात महापालिकेने शहरात सुरू केलेल कोवीड सेंटर बंद होते. ते पुन्हा सुरू केले जाणार आहे.
नटराज हॉटेलमध्ये पुरूषासाठीची शंभर तर जैन पितळे बोर्डींगमध्ये महिलांसाठी 70 खाटांचे कोवीड सेंटर दोन दिवसांत सुरू केले जाणार आहे.
तेथे तज्ज्ञ डॉक्टरांची नियुक्ती केली जाणार आहे. महापालिकेतर्फे करोनाग्रस्तांवर तेथे मोफत उपचार केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.