अहमदनगर Live24 टीम, 30 मार्च 2022 Maharashtra news :- अहमदनगरचे माजी जिल्हा पोलिस अधीक्षक आणि मुंबईतील पोलिस उपायुक्त सौरभ त्रिपाठी मुंबईत दाखल एका गुन्ह्यात फरारी आहेत. त्यांना सरकारनं निलंबित केलं आहे.
त्यांच्यावतीने मुंबईतील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता. कोर्टाने तो फेटाळून लावला आहे. त्यामुळे त्रिपाठी यांच्यापुढील अडचणी आणखी वाढल्या आहेत.
त्रिपाठी यांच्यावर मुंबईतील कुरिअर कंपनीकडून दहा लाखांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. त्यावरून त्रिपाठी यांच्याविरोधात मुंबई क्राइम ब्रांचने काही दिवसांपूर्वीच खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
त्रिपाठी १९ फेब्रुवारीपासून ड्यूटीवर आलेले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी त्यांचा शोध घेतला असता ते मिळून आले नाही. त्यामुळे त्यांना फरारी घोषित करण्यात आले. त्यानंतर त्यांना निलंबित करण्यात आलं.
मधल्या काळात त्रिपाठी यांनी मुबंईतील सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला होता. तो कोर्टाने फेटाळला आहे. आता त्यांच्यापुढे उच्च न्यायालयात जाण्याचा पर्याय आहे. दुसरीकडे त्यांचा ठामठिकाणा पोलिसांनी अद्याप लागलेला नाही.