Cyclone Fabien 2023 : ओडिशा किनारपट्टीच्या दिशेने घोंगावणारे ‘मोचा’ चक्रीवादळ बांगलादेश, म्यानमारच्या दिशेने निघून गेले. त्यापाठोपाठ दक्षिण हिंद महासागरात ‘फॅबियन’ नावाचे दुसरे चक्रीवादळ तयार होत आहे.
मान्सूनच्या एक महिना आधीच आलेल्या मोचा चक्रीवादळामुळे मान्सूनवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात होती, पण असे झाले नाही. आता ‘फॅबियन’ चक्रीवादळ तयार झाले आहे. दक्षिण हिंद महासागरातून ते हळूहळू किनाऱ्याच्या दिशेने जात आहे.
या चक्रीवादळात वाऱ्याचा वेग प्रचंड असल्याने समुद्रकिनाऱ्यालगतच्या राज्यांना आणि ज्या देशांच्या सीमारेषा समुद्रकिनाऱ्यालगत आहेत, त्यांना हवामान विभागाच्या माध्यमातून अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या चक्रीवादळाला किनारपट्टीवर पोहोचण्यासाठी आणखी काही दिवस लागणार आहेत. वादळाचा परिणाम आतापासूनच जाणवत आहे. पूर्वेकडील काही राज्यांमध्ये पाऊस आणि देशातील काही राज्यात उष्णता वाढली आहे. या चक्रीवादळचा भारतावर थेट परिणाम होणार नाही, असे भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे.
मान्सून पॅटर्न मध्ये झाला बदल !
मान्सून पॅटर्न बदललेला आहे आणि २५ मे ते ७ जून या कालावधीत विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर भारत, तसेच ईशान्य भारतात मोठ्या प्रमाणात तापमान वाढण्याची शक्यता आहे. भारतात ठिकठिकाणी व कदाचित महाराष्ट्रातही पारा ५० अंशापलीकडे जाण्याची शक्यता आहे.
मान्सूनसमोर वादळ थिटे !
मान्सून ही खूप प्रचंड मोठी ॲटमॉस्फिअरिक सिस्टिम आहे, जी प्रचंड ऊर्जा घेत बनते. त्या तुलनेने तयार होणारी चक्रीवादळे ही अत्यंत लहान असतात. मान्सूनसमोर ते वायूंचे भोवरे असतात. त्यासाठी मोठी ऊर्जा लागते, तरीही ती मान्सूनपेक्षा अत्यंत कमी व नगण्य ऊर्जा घेतात. मान्सूनची सिस्टिम बनण्याची प्रक्रिया वर्षभर अखंड सुरू असते.
चक्रीवादळे ही वातावरणातील अस्थिरतेमुळे निर्माण होतात. सुमारे ३०० तासांचा सरासरी कालावधी घेत अवघ्या दहा-पंधरा दिवसांत वादळे नष्ट होतात. त्यामुळे मान्सूनच्या सिस्टिमवर चक्रीवादळांचा परिणाम होत नाही. चक्रीवादळे ही वातावरणातील अस्थिरतेमुळे पूर्व मान्सून व मान्सूनोत्तर काळात बनतात