नगर-आष्टी रेल्वेमार्गासाठी ‘तारीख पे तारीख सुरूच’ नवा मुहुर्तही टळला

अहमदनगर Live24 टीम, 05 मे 2022 Maharashtra News :-  नगर-बीड-परळी रेल्वेमार्गावरील नगर ते आष्टी या काम पूर्ण झालेल्या मार्गावर प्रत्यक्ष रेल्वे धावण्यासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

यासाठी खुद्द रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जाहीर केलेला सात मे रोजीचा मुहुर्तही टळला आहे. मंत्र्यांनी तारीख जाहीर केली असली तरी आमच्याकडे आतापर्यंत अधिकृतपणे काहीही माहिती आली नसल्याचे रेल्वे प्रशासनाने सांगितले.

गेल्या आठवड्यात मुंबईतील एका कार्यक्रमात दानवे यांनी सात मे ही तारीख जाहीर केली होती. नगर-बीड-परळी या रेल्वे मार्गावरील आष्टीपर्यंतचे पूर्ण काम झाले आहे.

आष्टी सोलापूरवाडी आणि नारायणडोह ही तीन स्थानके तयार असून गाडीची चाचणी घेण्यात आली आहे. यावरून ७ मे पासून गाडी धावणार असून कार्यक्रमास राज्यमंत्री दानवे, बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे, नगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले होते.

प्रत्यक्षात मात्र या दिवशी हा कार्यक्रम होऊ शकत नसल्याची माहिती आता पुढे आली आहे. यापूर्वीही यासाठी अनेकदा तारखा जाहीर झाल्या होत्या. मात्र, आता खुद्द रेल्वे राज्यमंत्र्यांनीच तारीख जाहीर केल्याने आशा पल्लवीत झाल्या होत्या.

Ahmednagarlive24 Office

Recent Posts