बाजारात कोरोनाचे नियम न पाळल्यास आठवडे बाजार बंद करण्याबाबत निर्णय !

अहमदनगर Live24 टीम, 22 मार्च 2021:- जिल्ह्यात कोरोनाचा दुसरा टप्पा सुरू झाल्याने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना करण्याबाबत सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी श्रीगोंदे तहसील कार्यालयात शनिवारी घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीत केल्या.

सर्व शासकीय कार्यालयात मास्कचा वापर, सोशल डिस्टंसिंगचे पालन, तसेच सर्व शासकीय कार्यालयांमध्ये हात धुण्याची व्यवस्था करावी तसेच तालुक्यातील आरोग्य केंद्रे, कोविड केअर केंद्रांवर स्वच्छतेचे सर्व उपाय करण्यात यावेत,

यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे व सकारात्मकरीत्या प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी श्रीगोंदे तहसील कार्यालयात घेतलेल्या कोरोना आढावा बैठकीत दिल्या.

यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी क्षीरसागर, प्रांताधिकारी सुधाकर भोसले, डॉ. स्वाती दाभाडे, तहसीलदार प्रदीप पवार, श्रीगोंदे नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन खामकर, महसूल, कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीमध्ये कोरोना संकटाच्या काळात सर्व यंत्रणातील अधिकारी, कर्मचारी यांनी स्वतःसह सर्व नागरिकांची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, आवश्यक त्या सर्व उपाययोजना शासकीय कार्यालये, कोविड केअर सेंटरमध्ये कराव्यात. विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाई करून त्यांना मास्कचे महत्त्व पटवून द्यावे.

मास्क हीच सध्याची लस आहे, हे जनतेला पटवून सांगावे. तालुका ठिकाणी व गाव पातळीवरील प्रत्येक व्यापारी व्यावसायिक, फिरते व्यावसायिक, भाजी विक्रेते आदी व्यापाऱ्यांची चाचणी करण्यास प्राधान्य द्यावे तसेच आठवडे बाजारात फिरून बाजारात कोरोनाचे नियम न पाळल्यास आठवडे बाजार बंद करण्याबाबत निर्णय घेण्याचे सांगितले.

या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर मात्र कठोर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts