अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- कोरोनाच्या टाळेबंदीत विडी कारखाने बंद करण्यात आल्याने विडी कामगारांचा रोजगार बुडून कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.
अशा परिस्थितीत तातडीने विडी कारखाने सुरु करण्यास परवानगी द्यावी व दोन हजार रुपये अनुदान मिळण्याच्या मागणीसाठी लालबावटा विडी कामगार युनियनच्या (आयटक) वतीने श्रमिकनगर येथे विडी कामगारांनी निदर्शने केली.
या आंदोलनात जिल्हा सचिव अॅड.कॉ. सुधीर टोकेकर, उपाध्यक्षा कॉ. भारती न्यालपेल्ली, कमलाबाई दोंता, शोभा पासकंठी, लक्ष्मी कोटा, शोभा बिमन, शारदा बोगा, निर्मला न्यालपेल्ली, संगिता कोंडा, सगुना श्रीमल, भाग्यलक्ष्मी, गड्डम, सुमित्रा जिंदम आदिंसह विडी कामगार महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
कोरोनाच्या टाळेबंदीत विडी कारखाने 48 दिवसापासून बंद असल्याने शहरातील चार ते पाच हजार विडी कामगारांचा रोजगार बुडाला आहे. विडी कामगार आर्थिक दुर्बल घटक असून, विडी कामगारांचा उदरनिर्वाह विडी बनवून रोजच्या मजुरीवर चालत असतो.
मात्र हाताला काम नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न बिकट बनला आहे. विडी कामगारांनी विडी कंपनीकडे आगाऊ रकमेची मागणी केली होती. साबळे वाघीरे व ठाकूर सावदेकर यांनी विडी कामगारांना प्रत्येकी एक हजार रुपये आगाऊ रक्कम दिली.
मात्र सध्या टाळेबंदीत शिथीलता केली जात असताना विडी कारखान्यांना कोरोनाचे नियम पाळून सकाळी 7 ते 11 पर्यंत परवानगी दिल्यास विडी कामगारांच्या हाताला काम मिळून त्यांचा प्रश्न सुटू शकणार आहे.
तसेच या आर्थिक मंदीतून बाहेर येण्यासाठी विडी कामगारांना राज्य सरकारने दोन हजार रुपयाचे अनुदान देण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे.
- अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा
- फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम