पदोन्नतीत आरक्षण मिळण्यासाठी आरपीआयचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- पदोन्नती मध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकारने त्वरित घ्यावा, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने जिल्हाधिकारी कार्यालया समोर निदर्शने करण्यात आली.

या आंदोलनात आरपीआयचे युवक शहराध्यक्ष अमित काळे, उत्तर महाराष्ट्र सचिव अजय साळवे, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, आयटी सेलचे संपर्क प्रमुख मंगेश मोकळ, विवेक भिंगारदिवे, प्रविण वाघमारे, दया गजभिये, सचिन धीवर, विलास साळवे, जय दाभाडे, विक्रम चव्हाण, कृपाल भिंगारदिवे, चंद्रकांत भिंगारदिवे आदी सहभागी झाले होते.

राज्य सरकारनेपदोन्नती मध्ये आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री ना. रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली दि.1 जून ते 7 जून पर्यंत संपुर्ण महाराष्ट्र राज्यात आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

या पार्श्‍वभूमीवर बुधवारी (दि.2 जून) रोजी जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करण्यात आले. तसेच आरपीआयचे राज्य उपाध्यक्ष आणि अहमदनगर जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव यांच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांच्या नेतृत्वाखाली संपुर्ण अहमदनगर जिल्ह्यात तालुकास्तरावर कोरोनाचे नियम पाळून गर्दी न करता आंदोलन करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पदोन्नतीमध्ये आरक्षण हा मागासवर्गीयांचा हक्क आहे. सर्वोच्च न्यायालयाने पदोन्नती मध्ये आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारला घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार पदोन्नती मध्ये आरक्षणाचा निर्णय राज्य सरकार ने त्वरित घेण्याची प्रमुख मागणी आरपीआयच्या वतीने करण्यात आली आहे.

महाविकास आघाडी सरकार स्वतःला पुरोगामी म्हणणारे सरकार असले तरी पदोन्नती मधील मागसावर्गीयांच्या आरक्षण प्रश्‍नी महाविकास आघाडी चा बुरखा फाटला आहे. महाविकास आघाडी सरकार हे दलित विरोधी सरकार असल्याचा आरोप आरपीआयच्या वतीने करण्यात आला आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe