अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :- आमच्या कारखाना लगतचा आम्हीच केलेला रस्ता दाखवण्याऐवजी, तुमच्या कारखान्याजवळ तुमच्या गावात जाणारा रस्ता आम्हाला दाखवा. आम्ही सर्व पत्रकारांसह आमचे वाहन घेऊन येऊ.अकराशे कोटींचा निधी आणला म्हणता यातून स्वतःच्या गावाकडे जाणारे रस्ते देखील करता आले नाहीत.
एवढेच काय पिण्याच्या पाण्याची देखील टंचाई तुमच्या गावात आहे. भूमिपूजनाचे नारळ फोडून विकास होत नसतो. यासाठी गुंड प्रवृत्तीचे कार्यकर्ते व टक्केवारीसाठी पोसलेले ठेकेदार दूर करून विकास कामे करावी लागतात. तसेच झोपनाऱ्याला उठवता येते, मात्र तुम्ही झोपेचं सोंग घेतले असल्याने आपणाला झोपेतून उठवणे अशक्य आहे,
अशी उपरोधिक टीका राष्ट्रवादीचे युवा नेते ऋषिकेश ढाकणे यांनी आमदार मोनिका राजळे यांचे नाव न घेता केली. दोन दिवसांपूर्वी झालेल्या जाहीर कार्यक्रमात आमदार मोनिका राजळे यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष अॅड. प्रताप ढाकणे यांच्यावर कुंभकरणाप्रमाणे साडेचार वर्षे झोप घेतल्याचा आरोप करत,
माझ्या वाहनात बसा मी केलेली विकास कामे तुम्हाला दाखवते, अशी जहरी टीका केली होती. याला प्रत्युत्तर देण्यासाठी बुधवारी पक्षाच्या कार्यालयामध्ये संघर्ष योद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर सहकारी साखर कारखान्याचे तज्ञ संचालक राष्ट्रवादीचे युवक नेते ऋषिकेश ढाकणे यांनी पत्रकार परिषद घेत आमदार राजळेंना प्रत्युत्तर दिले.
यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष शिवशंकर राजळे, नगरसेवक चंद्रकांत भापकर, योगेश रासने, देवा पवार, अक्रम आतार आदी उपस्थित होते. ढाकणे म्हणाले, आम्ही कोविड सेंटर सुरू केले तेही सामाजिक संस्थेच्या माध्यमातून त्याची कुठेही जाहिरातबाजी केली नाही. तुम्ही मात्र कोविड सेंटरला डस्टबिन दिले.
त्यावर स्वतःचा फोटो चिटकवला. आमच्या कारखान्या लगतचा रस्ता सुरुवातीला माजी मंत्री बबनराव ढाकणे यांनी मंजूर करून घेतला. त्यानंतर माजी आमदार चंद्रशेखर घुले यांनी त्यावर खडीकरण केले. येथील दोन गावांनी रस्ता नसल्यामुळे तुमच्या काळामध्ये मतदानावर बहिष्कार टाकला.
मात्र अॅड.प्रताप ढाकणे यांनी अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतून त्यासाठी निधी मिळवला. तुमच्या आमदार निधीतून हा रस्ता झालेला नाही.
विकास करायचा असेल तर तुमच्या कारखान्याकडे जाणाऱ्या रस्त्याचा करा.आमच्या कारखान्याची एवढी काळजी असेल तर जिल्हा बँकेच्या माध्यमातून आमच्या कारखान्याला कर्ज न मिळावे यासाठी डावपेच करून आम्हाला नेहमी त्रास दिला.
मात्र औरंगाबाद जिल्ह्यातील माहेरच्या कारखान्याला कोट्यवधी रुपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले. तुमच्या गावात पिण्याचे शुद्ध व नियमित नागरिकांना पिण्याचे पाणी द्या. पंचायत समितीमध्ये टँकरचा भ्रष्टाचार होऊन गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.