अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या घटत आहे. मात्र त्याचबरोबर एक चिंताजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यातील बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. दरम्यान रेड झोनमध्ये समावेश असलेल्या नगर जिल्ह्यात नव्या रुग्णांमध्ये १८ वर्षांखालील रुग्णांची संख्याही लक्षणीय आहे.
बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करून प्रशासनाने काम सुरू केल्याचे सांगण्यात येत असले तरी बाधित मुलांची माहिती मात्र अद्याप वेगळी उपलब्ध करून देण्यात आलेली नाही. कोरोनाच्या दुसर्या लाटेत मृत्यूचे प्रमाणही लक्षणीयरित्या वाढले.
२६ मे पर्यंत २,९६९ जणांनी करोनामुळे जीव गमावला आहे. अवघ्या दोन-अडीच महिन्यांत १,७९९ मृत्यू नोंदले गेले. एप्रिल महिन्यात मृत्यूचे तांडवच सुरू होते. अद्यापही मृत्यूचे आकडे कमी होताना दिसत नाहीत. गेल्या २४ तासांत ६६ मृत्यू झाल्याची नोंद आहे.
नव्या बाधितांचे आकडे कमी होत आहेत. उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्याही कमी होत आहे. त्यामुळे बेड, ऑक्सिजन, औषधे यासाठी दोन महिने सुरू असलेली धावपळ आता थांबली आहे. ही जमेची बाजू असली तरी मृत्यूंचे आकडे चिंताजनक आहेत.
करोनानंतर आलेल्या म्युकरमायकोसिसनेही चिंता वाढविली असून आतापर्यत १८० रुग्ण आढळून आले असून त्यातील चौघांचा मृत्यूही झाला आहे. याशिवाय काही गंभीर रुग्ण पुण्यातही दाखल आहेत.