जिल्हा बँक निवडणूक ! फोडाफोडीचे राजकारण परंपरा यावेळी देखील कायम

अहमदनगर Live24 टीम, 22 फेब्रुवारी 2021:-जिल्हा बँकेच्या निवडणुकीत कर्जत तालुक्यामधून आ. राधाकृष्ण विखे गटाचे अंबादास पिसाळ ३७ मते मिळाली. तर विरोधी महाविकास आघाडीच्या उमेदवार साळुंके 36 मते मिळाली.

यात एक मताने साळुंके यांचा पराभव झाला. यावरून तालुक्यातील जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत मतांच्या फोडाफोडीचे राजकारण परंपरा यावेळी देखील कायम राहिली.

दरम्यान जिल्हा बँकेच्या निवडणुकीत मतदानाच्या आदल्या रात्री कर्जत सोसायटी मतदारसंघातील ४५ मतदार हे बारामती येथे एका हॉटेलवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके यांच्या सोबत होती.

मात्र, प्रत्यक्षात मतमोजणीनंतर यातील ९ मते यामध्ये फुटल्याचे समोर आले आहे. यामुळे काँग्रेसच्या उमेदवार मिनाक्षीताई साळुंके यांचा पराभव झाला असून आ. रोहित पवार यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

तालुक्यामध्ये कोणती नऊ मते फुटली यावर आता उलटसुलट चर्चा सुरू आहे. कर्जत सोसायटी मतदारसंघातील ही निवडणूक आ. पवार अतिशय प्रतिष्ठेची केली होती.एवढे असतानाही पिसाळ यांनी अखेरच्या क्षणाला विजय खेचून आणला.

निकाल जाहीर होताच भाजप व विखे-पिसाळ समर्थकांनी शहरामध्ये फटाके फोडून व गुलालाची उधळण करत जल्लोष केला.यावेळी नवनिर्वाचित संचालक पिसाळ म्हणाले, सुरुवातीला ही निवडणूक माझ्यासाठी एक तर्फे होती.

मात्र काही नेत्यांच्या सहभागामुळे व दबावाच्या राजकारण यामुळे अडचण निर्माण झाल्या. तसेच पराभूत झालेल्या साळुंके यादेखील बँकेमध्ये सहकारी होत्या.

त्यांच्या पराभवामुळे मला देखील खूप वाईट वाटले आहे. येणार्‍या काळात त्यांना सोबत घेऊन तालुक्यामध्ये सेवा सहकारी संस्था याचे सभासद यांना मदत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts