Ahmednagar Breaking: राहुरी तालुक्यातील डॉ. बी. बी. तनपुरे सहकारी साखर कारखाना २०२२-२३ या गाळप हंगामासाठी कारखान्याच्या व्यवस्थापन मंडळाच्या ताब्यात देण्याचा निर्णय जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेने घेतला आहे.
त्यामुळे येत्या हंगामात हा कारखाना सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कर्ज थकल्याने या कारखान्यावर जिल्हा बँकेचा ताबा आहे.
कारखान्याचे चेअरमन व संचालक मंडळाने येत्या गाळप हंगामासाठी कारखाना व्यवस्थापन मंडळाच्या ताब्यात देण्याची मागणी केली होती.
बँकेच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत यावर चर्चा झाली. त्यानुसार कारखाना व्यवस्थापन मंडळाच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेण्यात आला.
कार्यक्षेत्रातील व जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतक-यांच्या ऊस गाळप होण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. यामुळे कामगारांचाही प्रश्न मार्गी लागेल.
यापूर्वी कारखान्याचे व्यवस्थापन मंडळाच्या मागणी नुसार कारखान्याच्या थकबाकीचे पुनर्गठण करून, कर्जाच्या मंजुरीपत्रातील अटी व शर्तीनुसार चालविण्यासाठी कारखाना संचालक मंडळाच्या ताब्यात दिलेला आहे. अटी व शर्ती मान्य केल्याचा रितसर करारही कारखान्याने बँकेस करुन दिलेला आहे.