अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- जिल्हा रूग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भूषणकुमार रामटेके यांनी त्यांच्या पत्नीला देण्यासाठी दिलेल्या वस्तूची बॅग कर्मचार्याकडून गहाळ झाल्याची घटना घडली.
याप्रकरणी जिल्हा रूग्णालयातील कर्मचारी संजय गंगाधर वाकचौरे (रा. चंदनापुरी ता. संगमनेर) याच्याविरोधात येथील तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामटेके यांच्या पत्नी कल्पना भूषणकुमार रामटेके (वय 43 रा. जिल्हा रूग्णालय परिसर, मुळ रा. सिडको, औरंगाबाद) यांनी फिर्याद दिली आहे.
20 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रामटेके यांनी कर्मचारी वाकचौरे याच्याकडे एक बॅग दिली होती. या बॅगेत आठ हजार रूपयाची रोख रक्कम, चार पेनड्रायव्ह, दोन एटीएम कार्ड होते.
ही बॅग डॉ. रामटेके यांच्या पत्नी कल्पना यांच्याकडे सिडको, औरंगाबाद येथे देण्यास सांगितले होते. वाकचौरे याने या वस्तू असलेली बॅग कल्पना रामटेके यांना दिली नाही.
ही बाब डॉ. रामटेके यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी वाकचौरे याच्याकडे चौकशी केली.
चौकशीदरम्यान त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे गुरूवारी वाकचौरे विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार डी. बी. जपे करीत आहे.