अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:-यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य सुत्रधार डॉ.बाळ ज.बोठे याचे नाव या गुन्ह्यात निष्पत्र झाल्यापासून हा बहाद्दर फरार झाला असून, या हत्याकांडातील इतर पाच आरोपी पोलिसांनी अल्पकालावधीत जेरबंद केले आहे.
मात्र आता जवळपास अडिच महिने झाले तरी देखील हा सहावा फरार आरोपी मास्टरमाईंड बाळ ज. बोठे पोलिसांना सापडत नाही, ही अतिशय धक्कादायक व गंभीर बाब आहे.
चार्जशिट दाखल करण्याची वेळ संपत आली तरी देखील हा फरार आरोपी पोलिसांना सापडत कसा नाही. यावर संशोधनाची वेळ आली आहे. ‘तेव्हा काहीही करा पण या फरार बहाद्दरास कुठल्याही परिस्थिती अटक करा,
अशी मागणी ॲड.सुरेश लगड यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज कुमार पाटील व तपासी अधिकारी अजित पाटील यांना निवेदनाव्दारे केली आहे. आपल्या अधिपत्याखाली पोलिसांनी अनेक सराईत व फरार गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.
परंतु डॉक्टर व वकिलीची डिग्री संपादन करणारा हा मास्टरमाईंड बहाद्दर आपणास शोध घेवून सापडत नाही ही अतिशय गंभीर बाब आहे.
या फरार आरोपीचा ठावठिकाणा मिळण्यासाठी त्याच्या घरी होणाऱ्या फोन कॉलची सविस्तर माहिती घ्यावी व काहीही करून या आरोपीस अटक करून जनतेस आनंदाची बातमी द्यावी.
आपल्या अधिपत्याखालील पोलिस दलास अनेक फरार आरोपी सापडत आहेत व आम्ही नगरकर अजूनही आज्ञावादी आहोत की आपण योग्य रितीने तपास करून या फरार आरोपीस लवकर जेरबंद कराल. या फरार आरोपीकडून जामीन मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात प्रयत्न करण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मात्र त्याचा अटकपूर्व जामीन कसा रद्द करता येईल यासाठी आपण स्वत: जातीने सर्वोच्च न्यायालयात हजर राहून सरकारी वकीलांना तशी कल्पना द्यावी.यदाकदाचित आपला हा तपास सीआयडीकडे वर्ग केल्यास तो आपल्या अपमान असेल. असे या निवेदनात नमूद केले आहे.