India News : अयोद्धेनंतर ज्ञानव्यापी आणि पुढे इतरही ठिकाणांवर हिंदूचे प्रार्थनास्थळ असल्याचा दावा करणऱ्यांचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी कान टोचले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय शिक्षा वर्गाचा समारोप रेशीमबाग मैदानावर झाला.
यावेळी सरसंघचालक भागवत बोलत होते. ते म्हणाले, ‘ज्ञानव्यापीशी हिंदूंच्या भावना जुळलेल्या आहेत. त्यावर न्यायपालिका देईल तो निर्णय प्रत्येकाने मान्य करायला हवा. मात्र, याचा अर्थ प्रत्येक मशिदीत शिवलिंग शोधू नये. आम्ही म्हणू तेच खरे आहे, असा कट्टरतावाद तसेच अहंकार कुणीही बाळगू नये.
ही भारतभूमी सर्वांना सामावून घेणारी आहे. कुणालाही न बदलविणारी, प्रत्येकाच्या पूजापद्धतीचा सन्मान राखणारी आपली परंपरा असून त्यानुरूप हिंदूंनीही स्वतःचे आचरण ठेवावे.’ सरसंघचालक पुढे म्हणाले, ‘देशाच्या प्रत्येक स्वातंत्र्यलढ्यात हिंदूंसोबत राष्ट्रीय वृत्तीचे मुस्लिम लढले आहेत.
अश्फाकउल्ला खान, इब्राहिम खान गारदी हे येथील मुस्लिमांसाठी आदर्श आहेत. त्यांचा संबंध भारताशी आहे, बाहेरील राष्ट्रांशी नाही. मुस्लिम समाजानेही भारत ही मातृभूमी म्हणून स्वीकारली आहे, येथील सर्वसमावेशक भारतीय संस्कृती स्वीकारली आहे.
फाळणी झाली तेव्हा आपली पूजा पद्धती वेगळी आहे म्हणून आपण पाकिस्तानात जावे, असे न वाटल्यामुळेच मुस्लिम येथे थांबले. अशा या भारतासोबत समरस होऊन राहायला हवे. वेगळेपणाचा राग पुन्हा आळवू नये’.