अहमदनगर Live24 टीम, 10 फेब्रुवारी 2021:-एरवी नगर शहराच्या रस्त्यांवरून बिनदिक्कतपणे दिवसा वा रात्री फिरणे सुरक्षित आहे, असे म्हणणे केवळ आभास ठरू लागले आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये नगर शहरातील रस्त्यांवर रात्री-बेरात्री होणाऱ्या लुटमारीमुळे नागरिकांना धडकी भरली आहे.
दुचाकी अथवा चारचाकींमधून येणारे टवाळ काहीही कारण काढून नागरिकांना अडवितात. काही समजण्याच्या पूर्वीच मारहाण करून ऐवज लुटून पसार होतात.
दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये शहरात चैनस्नॅचिंगचे प्रमाण वाढले आहे. या लुटारूंनी शहरात उच्छांद मांडला असून महिलांना घराबाहेर फिरणेही भितीचे वाटू लागले आहे.
धूम स्टाईल चोरीच्या वाढत्या घटना पाहता पोलिसांनी धूमखोरांना गजाआड करून शहरात पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी महापौर बाबासाहेब वाकळे यांनी केली आहे.
तसे पत्र त्यांनी एसपी मनोज पाटील यांना दिले. नगर शहरात सोमवारपासून धूम स्टाईलने महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने लंपास करण्याच्या घटना वाढल्या आहेत.
भरदिवसा दरोडा टाकून चोरटे लूटमार करत आहेत. रस्त्यावर फिरणार्या महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने ओरबडून पळ काढणार्या धूमखोरांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
धूमखोरी चोर्यांची तक्रार त्या त्या भागातील नगरसेवक व महापौर नात्याने आपल्याकडे लोक करत आहेत. भितीमुळे महिला घराबाहेर पडण्यालाही घाबरत आहेत.
तपास यंत्रणा सक्षम करून पोलिसांनी तातडीने चोरांना गजाआड करावे आणि शहरात गस्त वाढावी अशी मागणी महापौर वाकळे यांनी केली आहे.