अहमदनगर Live24 टीम, 19 मे 2021 :- जिल्ह्यामध्ये दैनंदिन कोरोनाबाधित रुग्णसंख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान लहान मुलेदेखील कोरोनाबाधित झालेली आहेत.
दरम्यान येणाऱ्या तिसर्या लाटेपूर्वी प्रतिबंधात्मक उपाययोजनाचा भाग म्हणून जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी बालरोगतज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन केला आहे.
यामध्ये जिल्हा रुग्णालयातील बालरोगतज्ज्ञ डॉ. आशीष कोकरे हे टास्क फोर्सचे अध्यक्ष असून अन्य नऊ डॉक्टरांचा समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे. हा टास्क फोर्स जिल्ह्यातील बालरोगतज्ज्ञांना मार्गदर्शन करणार आहे.
देशासह राज्यात वैद्यकीय तज्ज्ञांनी कोरोना संसर्गाची तिसरी लाट लवकरच येत असल्याची धोक्याची सूचना दिली आहे.
त्यामध्ये लहान मुले जास्त प्रमाणात बाधित होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यासाठी लहान मुलांमध्ये वाढत्या कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने तिसऱ्याला लाटेस पूर्ण क्षमतेने तयार राहण्याच्या दृष्टीने वैद्यकीय तज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापन करणे आवश्यक झाले आहे.
त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी काेरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून जिल्ह्यातील बालरोगतज्ज्ञ, डॉक्टर्स, नर्सेस,
आरोग्य कर्मचारी व सर्वेक्षणामध्ये सहभागी इतर कर्मचारी यांना आयसीएमआर यांच्या प्रोटोकॉलनुसार लहान मुलांचे कोरोनावरील उपचार,
आयसीयू व्यवस्था, तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बालरोगतज्ज्ञ टास्क फोर्स नियुक्त करण्यात आला आहे.