८ जानेवारी २०२५ अहिल्यानगर : विधानसभेच्या राहुरी मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनी ईव्हीएम पडताळणीचा अर्ज मागे घेतल्यानंतर आता संगमनेर विधानसभा मतदारसंघातून पराभूत झालेले माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि अहमदनगर शहर मतदार संघातून पराभूत झालेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभिषेक कळमकर यांनी देखील ईव्हीएम पडताळणीचा अर्ज मागे घेतला आहे.
तसेच पडताळणीसाठी जमा केलेली रक्कम पुन्हा मिळण्याची मागणी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.राज्य विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात पहिल्यांदाच आज पर्यंतचे उच्चांकी बहुमत घेत महायुतीची राज्यात पुन्हा सत्ता आली. निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यापासून महायुतीच्या या विजयावर विरोधी असलेल्या महाविकास आघाडीच्या वतीने प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.
मतदान संयंत्र अर्थात ईव्हीएम मशीनवर शंका उपस्थित करीत पडताळणीची मागणी राज्यात अनेक पराभूत उमेदवारांनी भारत निवडणूक आयोगाकडे संबंधित जिल्हा निवडणूक शाखेमार्फत केली.नगर जिल्ह्यातही प्रताप ढाकणे (शेवगांव-पाथर्डी), प्रा. राम शिंदे (कर्जत-जामखेड), संदीप वर्पे (कोपरगांव), प्राजक्त तनपुरे (राहुरी), राणीताई लंके (पारनेर), शंकरराव गडाख (नेवासा), अभिषेक कळमकर (नगर शहर), प्रभावती घोगरे (शिर्डी), बाळासाहेब थोरात (संगमनेर) आणि राहुल जगताप (श्रीगोंदा) या १० उमेदवारांनी आपल्या मतदान केंद्रातील विशिष्ट मतदान केंद्रांची सूची जोडून संबंधित मतदान केंद्रातील मतदान संयंत्राची अर्थात ईव्हीएम पडताळणीची मागणी भारत निवडणूक आयोगाकडे जिल्हा निवडणूक शाखेमार्फत केली.
भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणुकीत पराभूत झालेल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर असलेल्या उमेदवाराला संबंधित मतदार संघातील एकूण मतदान केंद्रांच्या पाच टक्के मतदान केंद्रांतील ईव्हीएम अर्थात मतदान यंत्राची तपासणीच्या मागणीस मान्यता आहे.
त्यासाठी एका मतदान केंद्रातील ईव्हीएमच्या तपासणीसाठी ४७ हजार दोनशे रुपये फी संबंधित उमेदवाराने आयोगाकडे मागणी अर्जासोबत जमा करणे बंधनकारक आहे.या नियमानुसार जिल्ह्यातील दहा उमेदवारांनी आयोगाने निश्चित केलेल्या रकमेसह मतदान यंत्र अर्थात ईव्हीएम मशीन पडताळणीची मागणी केली.
या ईव्हीएम मशीन पडताळणीच्या संदर्भात जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण देखील भारत निवडणूक आयोगाने आयोजित केले आहे.मतदान यंत्र ईव्हीएम फेर तपासणीची तारीख भारत निवडणूक आयोगाकडून निश्चित केली जाते.त्या तारखेच्या आधी तीन दिवसापर्यंत फेर पडताळणीची मागणी संबंधित उमेदवार पुन्हा मागे घेऊ शकतो.
राहुरी विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पराभूत उमेदवार माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या मतदारसंघातील पाच मतदान केंद्रातील ईव्हीएम पडताळणीचा अर्ज मागील आठवड्यातच मागे घेतला.त्या पाठोपाठ आता संगमनेर विधानसभा मतदार संघातील काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्याकडे ईव्हीएम पडताळणीचा सादर केलेला अर्ज लेखी पत्र देऊन मागे घेतला आहे.
संगमनेर मतदार संघातील १४ मतदान केंद्राच्या मतदान संयंत्राच्या पडताळणीची मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली होती. त्यासाठी आयोगाकडे प्रति मतदान केंद्र ४७ हजार २०० प्रमाणे सहा लाख ६० हजार ८०० रुपये पडताळणीची रक्कम भरली. आता मतदान यंत्र पडताळणीसाठी जमा केलेली रक्कम पुन्हा मिळण्याची मागणी या लेखी पत्राद्वारे थोरात यांनी आयोगाकडे केली आहे.
तसेच अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पराभूत उमेदवार अभिषेक कळमकर यांनी देखील जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांच्या नावे लेखी पत्र देत ईव्हीएम पडताळणीचा अर्ज मागे घेतला आहे.
कळमकर यांनी नगर शहर मतदार संघातील ३ मतदान केंद्रासाठी एकूण एक लाख ४१ हजार ६०० रुपये जमा केले आहेत.मंगळवार दि.७ जानेवारी पर्यंत जिल्ह्यातील दहा पैकी तीन पराभूत उमेदवारांनी दाखल केलेले ईव्हीएम पडताळणीचे अर्ज मागे घेतले आहेत.