अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2022 Farmer News : गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांमागची संकटाची मालिका काही थांबण्याचं नाव घेत नाही. निसर्गाच्या लहरीपणाशी (Climate Change) दोन हात करून शेतकरी बांधव कसेबसे आपले पीक जोपासतो मात्र लगेच सुलतानी दडपशाही शेतकऱ्याचा गळाचेप करण्यास तयार होते.
काहीसा असाच प्रकार या खरीप व रब्बी हंगामात देखील बघायला मिळत आहे. खरीप हंगामात (Kharif Season) निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता. रब्बी हंगामात (Rabbi Season) मात्र निसर्ग बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा होता.
रब्बी पिकांसाठी या वर्षी चांगले पोषक वातावरण असल्याचे कृषी वैज्ञानिकांनी देखील स्पष्ट केले होते. यामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा मिळाला होता आणि चांगल्या उत्पन्नाची आशा होती.
शिवाय यामुळे खरीप हंगामात झालेल्या नुकसानीची थोडीफार का होईना भरपाई होईल आणि पदरी चार पैसे शिल्लक राहतील अशी शेतकऱ्यांची भोळी भाबडी आशा होती.
मात्र रब्बी हंगामात महावितरणने (MSEDCL) शेतकरी बांधवांना जोराचा झटका दिला आहे. यामुळे डोळ्याला दिसणारे पीक पदरात पडेल की नाही याबाबत शेतकरी बांधव संभ्रमावस्थेत आहेत.
मध्यंतरी महावितरणने नियमांवर बोट ठेवत वीज तोडणीचा कार्यक्रम हाती घेतला होता या निर्दयी कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते तसेच रब्बी हंगामातील तसेच हंगामी पिकांना देखील यामुळे मोठा फटका बसला होता.
महावितरणच्या वीज तोडणी कार्यक्रमाचा (Irregular Electricity) शेतकऱ्यांनी कडाडून विरोध केला तेव्हा कुठे तूर्तास वीजजोडणी थांबविण्यात आले.
यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. मात्र शेतकरी सुखी कोणाला बघवत नाही म्हणूनच की काय आता महावितरणचे भारनियमन वाढवले आहे.
यामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होत आहे. केवळ रब्बी हंगामातील पीकच नाही तर भाजीपाला वर्गीय हंगामी पिकांचे देखील मोठे नुकसान होत आहे.
महावितरणच्या भारनियमन वाढवण्याच्या निर्णयाविरुद्ध निषेध म्हणून वाशिम जिल्ह्यातील जऊळका, कुत्तरडोह, अमानवडी येथील शेतकरी बांधवांनी जल आंदोलन छेडले आहे.
माय बाप प्रशासनाचे शेतकऱ्यांकडे लक्ष लागावे यासाठी सदर परिसरातील शेतकरी बांधवांनी पाण्यात उतरून जल आंदोलन केले आहे.
या जल आंदोलनाकडे महावितरण कोणत्या नजरेने बघते आणि भारनियमन कमी केले जाते की नाही हे विशेष बघण्यासारखे राहील.
शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने देखील पाठिंबा दर्शवला आहे. म्हणून महावितरणाच्या या निर्णयाचा विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांसमवेत स्वाभिमानीचे पदाधिकारी देखील पाण्यात उतरून जल आंदोलन करीत आहेत.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे म्हणून मायबाप शासन प्रयत्न करत नसून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी मात्र नाना प्रकारच्या युक्त्या शोधून काढत असल्याचा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला आहे.
स्वाभिमानीचे दामू अण्णा इंगोले यांनी सांगितले की, जोपर्यंत विद्युत पुरवठाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार आहे.