शेतकरी पुंडलिकासाठी यश उभ राहील उंबरठ्यावरी ! मराठमोळ्या पुंडलिकान पेरूच्या 2500 झाडापासून कमवलेत 25 लाख

Farmer Success Story : शेती करणं हे अलीकडे जिकिरीचे बनले आहे. सातत्याने हवामानाच्या बदलामुळे पिकांवर रोगराईचे सावट येत आहे. परिणामी पीक उत्पादनात घट आणि उत्पादन खर्च वाढत आहे. यामुळे शेतकऱ्यांचं आर्थिक बजेट कोलमडल आहे. अनेकांनी तर आता शेती नको रे बाबा असा ओरड सुरू केला आहे.

मात्र अंधारानंतर लखलखित प्रकाश हा दिसतोच. अशाच पद्धतीने शेतकरी बांधव देखील संकटावर मात करत यशाच्या प्रकाशाकडे आपला प्रवास करत आहेत आणि या प्रवासात यशाला मिठी देखील मारत आहेत. आज आपण अशाच एका अवलिया शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेणार आहोत ज्याने प्रतिकूल परिस्थितीत देखील शेतीतून लाखो रुपये कमवून इतरांसाठी मार्गदर्शक असं काम केलं आहे.

नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्याच्या मौजे रत्नाळी येथील प्रयोगशील शेतकरी पुंडलिक पुजरवाड यांनी विपरीत परिस्थितीत शेतीमध्ये बदल करत पेरूच्या शेतीतून आर्थिक प्रगती साधली आहे. या अवलिया शेतकऱ्याने दोन वर्ष अहोरात्र मेहनत घेऊन 25 लाखांची जंगी कमाई करण्याची किमया साधली असल्याने सध्या सर्वत्र त्यांच्या प्रयोगाची चर्चा पाहायला मिळत आहे.

विशेष म्हणजे पुंडलिकाने उत्पादित केलेले पेरू परराज्यात देखील लोकप्रिय झाले आहेत. हैदराबाद सारख्या शहरात या पेरूंचा गोडवा पसरला आहे. पुंडलिक इतर शेतकऱ्यांप्रमाणे आधी कापूस तूर सोयाबीन उडीद हरभरा यांसारखी पारंपारिक पिकांचीं शेती करत असत. या पारंपारिक पिकांच्या शेतीत भांडवल अधिक आणि हाती येणारे उत्पन्न खूपच कवडीमोल. त्यामुळे त्यांची आर्थिक घडी विस्कटली. म्हणून त्यांनी शेतीमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला.

मग काय 2019 मध्ये त्यांनी पेरूची बाग लावली. 2500 पेरूची रोपे मागवली आणि आपल्या पाच एकर क्षेत्रात याची लागवड करण्यात आली. पेरूच्या रोपांची लागवड झाल्यानंतर पुंडलिकाने वेळोवेळी शेतात जाऊन त्याची पाहाणी केली, वेळोवेळी पिकाला पाणी दिले, रोग येण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या. रोगांचे आक्रमण झाल्यास त्वरित तज्ञांच्या सल्ल्याने फवारणी केली.

झाडांना फळे लागली की फळांवर पोम कॅरीबॅग लावली. म्हणजेच बागेत त्यांनी देखभाल कमालीची केली. अधिक उत्पादनासाठी त्यांनी शेणखताचा वापर वाढवला. याच योग्य नियोजनाच्या जोरावर एक-एक पेरूचे फळ ७०० ते ८०० ग्रॅम वजनाचे तयार झाले. विक्रमी असं उत्पादन त्यांना या पेरू बागेतून मिळालं. आणि बाजारात चांगला दर मिळाला असल्याने त्यांना तब्बल 25 लाखांची कमाई 2500 पेरूच्या झाडातून झाली.

विशेष म्हणजे पेरूच्या बागेत स्वतः राबून स्वखर्चाने पेरूची मशागत केली. शासकीय अनुदानाचा लाभ घेण्यासाठी भटकंती करत राहण्यापेक्षा त्यांनी उत्पादन वाढीवर अधिक लक्ष केंद्रित केलं याचेच फलस्वरूप म्हणून त्यांना एवढी जंगी कमाई झाली असून इतरांसाठी त्यांनी मार्गदर्शक असं काम केल आहे.

Ajay Patil

Published by
Ajay Patil

Recent Posts