Ahmednagar News : मुळा पाटबंधारे विभागाच्या मनमानीपणामुळे अमरापूर, भातकुडगाव व कासार पिंपळगाव टेलच्या भागातील शेतकरी पन्नास टक्के हिश्याच्या मुळाच्या पाट पाण्यापासून वंचित राहत असून येथील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने कोणाला विकले जाते, यांची संबधितांनी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वृध्देश्वर वितरिका स्तरीय पाणी वापर संस्थेचे चेअरमन शिवाजी भिसे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अमरापूर विभागातील शाखा अमरापूर, भातकुडगाव व कासारपिंपळगाव, या टेलच्या भागातील शाखांचे कार्यक्षेत्र मोठे असून, या भागात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी असते, त्यामुळे उन्हाळ्यात एका अवर्तनाअभावी पिके जळून जातात,
टेलच्या भागाला अवर्तनाचा लाभ पाहिजे त्या प्रमाणात मिळत नाही. आजही अंतिम भागातील शेतकरी ५० टक्के सिंनापासून वंचित असून, पाण्याचा हक्क हा अधिकाऱ्यांच्या उदासिनतेमुळे हिरावला जात असून, चिरीमिरी देणाऱ्या शेतकऱ्यांना मुबलक पाणी दिले जाते.
मात्र, अमरापूर व कासार पिंपळगावातील शेतकऱ्यांना पाणी मोजून दिले जाते पाणीवाटप चुकीचे होत आहे. याबाबत वेळोवेळी शाखेच्या अधिकाऱ्यांचे पाणी मोजमाप दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे टेलच्या भागातील शेतकऱ्यांना पूर्ण दाबाने पाणी मिळत नाही.
पाणी चोरीचा फटका टेलच्या शेतकऱ्यांना बसत आहे. अधिकाऱ्यांकडूनच जलसुधार कायद्याला धाब्यावर बसविण्याचे काम होत असल्याने अशा अधिकाऱ्यावर संबंधित विभागाने कारवाई करण्याची मागणी भिसे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनाच्या प्रती अधिक्षक अभियंता नाशिक, कार्यकारी अभियंता मुळा पाटबंधारे विभाग अ.नगर व आमदार मोनिकाताई राजळे यांना देण्यात आल्या आहेत.