अहमदनगर Live24 टीम, 25 फेब्रुवारी 2021 :- पठार भागांवरील शेतकऱ्यांनी शेतीपंपाचा खंडित केलेला वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी कान्हूरपठार सबस्टेशमध्ये ठिय्या आंदोलन केले.
वीज वितरण कंपनीने कुठलीही पूर्व सूचना न देता कृषी पंपाचा वीज पुरवठा खंडित करून वीजबिल भरण्यासाठी तगादा लावला आहे.
आधीच कोरोना, अतिवृष्टीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पठार भागातील वाटाणा व कांदा अवकाळी पावसाने झोडपल्याने या पिकांना जगवण्यासाठी प्रचंड खर्च झाला मात्र त्या तुलनेत अत्यल्प भाव मिळाल्याने भांडवली खर्च ही वसूल झाला नाही.
त्यामुळे शेतकऱ्यांच्या सर्व आशा रब्बीच्या पिकांवर अवलंबून आहेत. या हंगामातील पिके दोन-तीन पाण्यावर आली असतांना महावितरणे अचानक वीजपुरवठा खंडित केल्याने हात-तोंडाशी आलेले पीक पाण्याअभावी जळुन जाण्याची भीती निर्माण झाली आहे.
प्रति डी.पी प्रमाणे शेतकरी वीज बील भरण्यास तयार आहे. पण ते वीज बिल भरण्यासाठी मुदत वाढ द्यावी व खंडित केलेला वीजपुरवठा त्वरित चालू करावा.
अशा मागणीचे निवेदनही महावितरणचे अधिकारी पंकज पाटील यांना उपस्थितीत शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आले.
त्यानुसार वीज बील भरण्यासाठी आठ दिवसांची मुदतवाढ देवून खंडित केलेला वीजपुरवठा सुरळीत केला. शेतकऱ्यांनी ही आठ दिवसांत वीज बील भरून महावितरणला सहकार्य करण्याची हमी देवून हे आंदोलन मागे घेतले.