Farming News: आत्महत्याग्रस्त बीड जिल्ह्यात शेतकऱ्याच्या भयंकर वास्तव पाहायला मिळत आहे. प्रचंड कष्टाने पिकवलेला कांदा विकूनही पदरात काहीच पडले नाही. याउलट आडत दुकानदाराला पैसे देऊन येण्याची वेळ बीड जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांवर आली आहे .
यामुळे तुम्हीच सांगा, आम्ही जगावं की मरावं ? ‘ असा सवाल कांदा उत्पादकाने केला आहे. बीड तालुक्यातील नागपूर बुद्रुक गावचे शेतकरी फुलचंद सिंघन यांच्याकडे दीड एकर शेती आहे. या दीड एकर शेतीवरच त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.
सोयाबीन पिकाने धोका दिल्यानंतर त्यांनी शेतात कांदा लागवड केली आणि या कांद्यावर सावकाराकडून घेतलेले कर्ज तसेच कांदा उत्पादनासाठी त्यांनी २ हजार रुपये नागरणीसाठी मोजले ३ हजार रुपये पेरणीसाठी, एक हजार बैलपाळीसाठी सात हजारांचे बियाणे, नऊ हजार खुरपणी १० हजार फवारणी, ३० हजार काढणी सात हजार २२५ रुपये खतासाठी खर्च झाला शेतात प्रचंड मेहनत केल्यानंतर कांदादेखील चांगला बहरला.
यामुळे शेतकरी फुलचंद सिघन यांच्यासह कुटुंबाच्या चेहयावर समाधान होते. सोलापूरच्या बाजारात चांगला भाव मिळतो, असा समज असल्याने त्यांनी झालेला ६० गोणी कांदा सोलापूरच्या सिद्धेश्वर आइत बाजारात आणला.
यावेळी त्यांच्या कांद्याला डोळे चक्राचतील असा भाव लागला. यात २५ पिशव्यांना दीड रुपया किलोप्रमाणे भाव देण्यात आला. दुसऱ्या २५ पिशव्यांना ५० पैसे प्रतिकिलो भाव मिळाला, १० पिशव्यांना एक रुपया किलो भाव देण्यात आला.
दोन हजार रुपये आडत, हमाली २३० रुपये, आडत तोलाई १३७ रुपये असा एकूण तीन हजार ८५७ रुपये खर्च झाला. दोन टन ९९६ किलो कांद्याचे २८७१ रुपये आले. त्यापैकी आडतवर ३८५७ रुपये खर्च झाला. शेतकऱ्याला ९८६ रुपये खिशातून द्यावे लागले आणि कांदा बाजारात विकावा लागला.
आमच्याकडे दीड एकर शेती आहे. त्यात यंदा कांदा लावला होता. या कांद्यावरच सावकाराकडून घेतलेले पैसे द्यायचे होते. मात्र बाजारात गेल्यावर कांद्याला ५० पैसे प्रतिकिलो भाव लागला निव्वळ थट्टा झाली. आता सावकाराचे पैसे द्यायचे कुठून? मजूर महिलांचे पैसे द्यायचे कुठून? -अशोक सिंघन, तरुण शेतकरी