FD Interest Rate: सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने ग्राहकांना नवीन वर्षाची भेट दिली आहे. BoB ने मुदत ठेवींचे व्याजदर वाढवले आहेत. बँकेने 2 कोटी रुपयांपेक्षा कमी एफडीवरील व्याजदर 15 ते 65 बेस पॉइंट्स म्हणजेच 0.15 ते 0.65% पर्यंत वाढवले आहेत.
देशांतर्गत रिटेल मुदत ठेवींवरील व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. नवीन दर 26 डिसेंबर 2022 पासून लागू झाले आहेत. या दरवाढीनंतर BoB आता 7 दिवसांपासून ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी सामान्य नागरिकांना 3% ते 7% दरम्यान व्याज दर देऊ करेल.
बँकेने विशेष FD बडोदा तिरंगा प्लस ठेव योजनेच्या व्याजदरातही वाढ केली आहे. 399 दिवसांत बडोदा तिरंगा प्लस ठेव योजनेत, सामान्य ग्राहकांना आता 7.05 % व्याज मिळेल. त्याचवेळी ज्येष्ठ नागरिकांना 7.55% व्याज दिले जात आहे.
FD Rate
बँक ऑफ बडोदा 7 दिवस ते 45 दिवसात मॅच्युअर होणाऱ्या एफडीवर 3% व्याज दर आणि 46 दिवस ते 180 दिवसांच्या मुदत ठेवींवर 4% व्याज देत आहे. बँक आता 181 ते 270 दिवसांच्या मुदतीच्या ठेवींवर 5.25% आणि 271 दिवस आणि त्यापेक्षा जास्त आणि 1 वर्षापेक्षा कमी कालावधीच्या ठेवींवर 5.75% व्याजदर देऊ करेल. बडोदा तिरंगा ठेव योजनेअंतर्गत, बँक ऑफ बडोदा 444-दिवस आणि 555-दिवसांच्या ठेवींवर 6.75% व्याज दर देत आहे.