अहमदनगर Live24 टीम, 31 जुलै 2021 :- नगर तालुक्यातील जेऊर येथील संतुकनाथ बाबांच्या मठातील वादावर श्री काळभैरवनाथ देवस्थान सोनारी जिल्हा उस्मानाबाद येथील मठाधिपती पिर योगी शामनाथजी महाराज व माजी आमदार शिवाजी कर्डिले यांच्या मध्यस्थीने पडदा पडला आहे.
जेऊर येथे श्री काळभैरवनाथ गुरुगादीच्या संतुकनाथ बाबांची संजीवन समाधी असुन जागृत देवस्थान म्हणून राज्यात प्रसिद्ध आहे येथे संतुकनाथ सेवा मंडळाकडून सुमारे पंचवीस वर्षापासून पूजा व आरती करण्यात येत आहे.
गावातील काही लोकांनी आरतीस मज्जाव केल्याने वातावरण चांगलेच चिघळले होते. या घटनेचा निषेध म्हणून ग्रामस्थांनी स्वयंस्फूर्तीने गाव बंद ठेवले होते.
संतुकनाथ देवस्थान श्रीकाळ भैरवनाथ देवस्थान सोनारी (जि.उस्मानाबाद) यांच्या आधिपत्याखाली येत असल्याने तेथील मठाधिपती पिर योगी श्यामनाथजी महाराज यांनी गुरुवारी वादाच्या पार्श्वभूमीवर जेऊर येथे भेट दिली.
त्यावेळी माजी आमदार शिवाजी कर्डिले उपस्थित होते. दोघांच्या मध्यस्थीने वादावर पडदा टाकण्यात आला आहे.