अहमदनगर Live24 टीम, 14 एप्रिल 2021 :- दक्ष पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष रोहिदास दातीर यांचा उद्या दशक्रिया विधी आहे. त्यांच्या हत्याकांडातील सर्व आरोपींना आजच्या आज अटक करून त्यांचा मरेपर्यंत फाशी द्यावी. तसेच त्यांना मदत करणाऱ्या लोकांना सह आरोपी करावे.
अन्यथा रोहिदास दातीर यांचा दशक्रिया विधी पोलिस ठाण्याच्या आवारात करण्यात येईल. असा इशारा विजय तमनर यांनी दिला आहे.
६ एप्रिल रोजी दुपारी साडेबारा वाजे दरम्यान राहुरी शहरातील मल्हारवाडी रोड परिसरातून पत्रकार रोहिदास दातीर यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना अमानुषपणे मारहाण करुन हत्या करण्यात आली.
त्याच दिवशी शहरातील कॉलेजरोड परिसरात त्यांचा मृतदेह आढळून आला होता. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत तालुक्यातील शेरी चिखलठाण येथून लाल्या ऊर्फ अर्जून विक्रम माळी याला ताब्यात घेतले.
तर त्याच्या दुसऱ्या दिवशी तौफिक शेख याला नाशिक जिल्ह्यातील निफाड येथून पकडून आणले. मात्र या घटनेतील मुख्य आरोपी कान्हू गंगाराम मोरे व अक्षय कुलथे हे अद्याप पसार आहेत.
या घटनेचा राहुरी येथील बिरोबा मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने निषेध करून आज दिनांक १४ एप्रिल रोजी तहसिल फसिओद्दीन शेख व पोलिस प्रशासनाला निवेदन देण्यात आले. रोहिदास दातीर यांच्या हत्याकांडातील आरोपींना तात्काळ अटक करून मरेपर्यंत फाशीची शिक्षा द्यावी.
आणि त्यांच्या परिवारास न्याय मिळवून द्यावा. असे निवेदनात म्हटले आहे. तसेच या हत्याकांडाच्या घटनेत आरोपींना काही लोकांनी पळवून लावण्यास मदत केली आहे. त्या लोकांना सह आरोपी करून कठोर शासन करावे.
अन्यथा रोहिदास दातीर यांचा १५ एप्रिल रोजीचा दशक्रिया विधी राहुरी पोलिस ठाण्याच्या आवारात करण्यात येईल. असा इशारा धनगर समाजातील कार्यकर्ते विजय तमनर यांनी दिला आहे.
या प्रसंगी बिरोबा मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नवनाथ ऊर्फ राणू सरोदे, खजिनदार सदाशिव सरोदे, सदाशिव सरोदे, काशिनाथ सरोदे, विष्णू सरोदे, भाऊसाहेब सरोदे, भास्कर मंडले, परसराम सरोदे, सुखदेव सरोदे, एकनाथ खेडेकर, भगवान खेडेकर, गंगाराम सरोदे, भारत मतकर आदि उपस्थित होते.