Food for Hydration : उन्हाळ्याच्या दिवसात स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी जास्तीत जास्त फळांचे सेवन करणे खूप गरजेचे आहे. कारण या दिवसात फळं खाल्ली तर शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण होते. इतकेच नाही तर या फळांपासून शरीराला मोठ्या प्रमाणात जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळतात.
तसेच शरीराला फायबर आणि भरपूर अँटीऑक्सिडंट्स देखील मिळतात. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते आणि उष्माघातासह अनेक आजार दूर राहण्यास मदत होते. उन्हाळ्याच्या दिवसात कोणती फळे खावीत? कशी आरोग्याची काळजी घ्यावी? जाणून घ्या.
ज्यावेळी शरीरात पाण्याची कमतरता असते त्यावेळी डिहायड्रेशनची समस्या निर्माण होते. इतकेच नाही तर कडक उन्हाळ्यात उष्माघाताचा धोकाही वाढत जातो. त्यामुळे जर तुम्हाला या सर्व गोष्टींपासून स्वत:ला सुरक्षित ठेवायचे असेल तर आहाराची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. तुमच्या आहारात तुम्ही उष्माघात आणि डिहायड्रेशन टाळण्यासाठी हंगामी फळांचा समावेश करावा.
याबाबत आहार तज्ज्ञ असे सांगतात की, ‘ या दिवसात कडक उन्हात तसेच उष्ण वाऱ्यात बाहेर जाणे टाळावे. जर तुम्हाला कामानिमित्त बाहेर जावे लागत असेल तर तुम्ही लिंबूपाणी किंवा इलेक्ट्रो पिऊन बाहेर जावे. इतकेच नाही तर शरीरातील द्रवपदार्थाचे प्रमाण पूर्ण करण्यासाठी फक्त पाण्यावर अवलंबून न राहता, तुमच्या आहारात थंड दूध आणि नारळपाणी यांचा समावेश करा.
करा या फळांचा आहारात समावेश
टरबूज
उन्हाळ्यात टरबूज खाणे खूप फायदेशीर आहे. कारण यात व्हिटॅमिन सी, ए आणि बी आढळून येते, त्यामुळे आरोग्य चांगले राहते. इतकेच नाही तर टरबूजमध्ये 90 टक्के पाणी असते, जे शरीराला डिहायड्रेट होऊ देत नसून उष्माघात टाळण्यास मदत करते.
खरबूज
तुमच्या आहारात खरबूजाचा जरूर समावेश करा. कारण त्यात भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे ए, डी, बी-6, लोह, मॅग्नेशियम आणि फायबर असते. जर तुम्ही याचे नियमित सेवन केले तर तुमच्या शरीरात पाण्याची कसलीच कमतरता भासत नाही. तसेच उष्माघाताचा धोका मोठ्या प्रमाणात कमी होतो.
डाळिंब
लोहयुक्त असणाऱ्या डाळिंबाचा उन्हाळ्याच्या दिवसात आहारात समावेश करणे अत्यंत फायदेशीर आहे. इतकंच नाही तर तुम्ही त्याचा रस पिऊ शकता. या फळात चांगले पाणी असल्यामुळे ते शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते. यामुळे बद्धकोष्ठता, पोटदुखी आणि पचनाच्या समस्या निर्माण होत नाहीत.
द्राक्ष
उन्हाळ्याच्या दिवसात पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी द्राक्षांचे सेवन करा. कारण द्राक्षांमध्ये 70 टक्क्यांहून अधिक पाणी असते, जे शरीराला हायड्रेट ठेवते. द्राक्षांमध्ये पोटॅशियम आढळत असून जे उच्च कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यास मदत करते.