माजी मंत्री राम शिंदे म्हणाले आगामी निवडणूक स्वबळावरच…

अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :-सत्तेत सहभागी असलेल्या ओबीसी नेत्यांच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचे आरक्षण गेले.

ओबीसी समाजाचा खरा कळवळा असेल, तर सत्तेत सहभागी असलेल्या ओबीसी नेत्यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मंत्री तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी गुरुवारी केली.

शिंदे म्हणाले, ओबीसीचे आरक्षण हे केवळ सत्तेत सहभागी असलेल्या ओबीसी नेत्यांच्या नाकर्तेपणामुळे गेले त्याला तेच जबाबदार आहेत.

त्यांना जर खरंच ओबीसी समाजाचा कळवळा असेल, तर त्यांनी तातडीने सत्तेतून बाहेर पडत राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. सत्तेत सहभागी असलेल्या नेत्यांचे कोणीही ऐकून घेत नाही.

ओबीसींना हक्काचे आरक्षण मिळावे, यासाठी भाजपकडून शनिवारी जिल्ह्याच्या १४ ठिकाणी चक्काजाम व रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. सरकारमध्ये सहभागी असलेल्या पक्षाला भाजपच्या ताकदीची जाणीव झाली आहे.

त्यामुळेच पंढरपूरच्या निकालानंतर आपला पक्ष संपतो की काय म्हणून हे पक्ष वेगवेगळे वक्तव्य करत आहेत. काँग्रेस राष्ट्रवादीच्या स्वबळाच्या संकेतानंतर शिवसेना निपचित पडल्याची स्थिती सध्या महाराष्ट्रात दिसून येत आहे.

तीन पक्षाचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजप विरोधी पक्षात बसलेला आहे. त्या दिवसापासून भाजपची स्वबळावर लढण्याची तयारी सुरू झाली. आम्ही स्वबळावरच लढण्यावर ठाम आहोत, असे माजी मंत्री राम शिंदे यांनी सांगितले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts