अहमदनगर Live24 टीम, 6 जून 2021 :- जिल्ह्याचा कोविड-19 चा साप्ताहिक पॉझिटीव्हीटी रेट 4.30 टक्के आणि ऑक्सिजन बेडवरील रुग्णांचे एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेडशी असलेले प्रमाण 24.48 टक्के दर्शविण्यात आलेले आहे.
त्यामुळे अहमदनगर जिल्हयाचा कोविड-19 चा साप्ताहिक पॉझिटीव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडवरील रुग्णांचे एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेडशी असलेले प्रमाण या आधारे जिल्हयाचा निर्बंधस्तर 1 मध्ये समावेश होतो.
त्यामुळे सोमवार दिनांक 07 जूनपासून हे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करणे नागरिकांना बंधनकारक असून त्या अटीवर हे निर्बंध उठविण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाचे अध्यक्ष डॉ. राजेन्द्र भोसले यांनी आज हे आदेश जारी केले आहेत.
साथरोग अधिनियम 1897 कलम 2(1) नुसार जिल्हाधिकारी अहमदनगर यांना अहमदनगर जिल्हा कार्यक्षेत्रात कोवीड 19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्याउपाययोजना करणे आवश्यक आहे त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषीत करण्यात आलेले आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखणेकामी प्रतिबंधात्मक उपाययोजनांतर्गत (Levels of Restrictions for Breaking the Chain) राज्यातील जिल्हे/ प्रशासकीय विभागांचे निर्बंधस्तर 1 ते 5 मध्ये वर्गीकरण करण्यात आले असून स्तरनिहाय विविध निर्बंध लागू करण्यात आलेले आहेत.
अहमदनगर जिल्हयाचा कोविड-19 चा साप्ताहिक पॉझिटीव्हीटी रेट 4.30%व ऑक्सिजन बेडवरील रुग्णांचे एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेडशी असलेले प्रमाण 24.48% दर्शविण्यात आलेले आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्हयाचा कोविड-19 चा साप्ताहिक पॉझिटीव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडवरील रुग्णांचे एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेडशी असलेले प्रमाण या आधारे जिल्हयाचा निर्बंधस्तर 1 मध्ये समावेश होतो.
या आधारे जिल्हयाचा अंतर्भाव असलेल्या निर्बंधस्तरानुसार व शासनाकडील सामान्य मार्गदर्शक सूचनांप्रमाणे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविणेकामी निर्देश देण्यात आलेले आहेत. त्यानुसार हे आदेश जारी करण्यात आले आहेत.
या आदेशानुसार, अत्यावश्यक वस्तूंशी संबंधीत दुकाने/आस्थापना त्यांचे नियमित वेळेत कार्यरत राहतील. बिगर अत्यावश्यक वस्तूंशी संबंधीत दुकाने/आस्थापना त्यांचे नियमित वेळेत कार्यरत राहतील. मॉल, चित्रपटगृहे (मल्टीपेक्स तसेच सिंगल स्क्रिन), नाटयगृहे 50% क्षमतेने नियमित वेळेत कार्यरत राहतील.
रेस्टॉरंट नियमित वेळेत कार्यरत राहतील. सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, जॉगिंग पार्क याठिकाणी वावर करण्यास निर्बंध असणार नाहीत. खाजगी कार्यालये त्यांच्या नियमित वेळेत कार्यरत राहतील. सर्व शासकीय तसेच खाजगी कार्यालये 100% उपस्थितीसह कार्यरत राहतील. सर्व क्रिडाविषयक क्रियाकल्प चालू ठेवणेस परवानगी असेल.
सर्व प्रकारच्या चित्रीकरणांवर कुठलेही निर्बंध असणार नाहीत. बंदीस्त सभागृहामध्ये लग्न समारंभाचे आयोजनास एकुण आसन क्षमतेच्या 50 टक्के किंवा 100 व्यक्तीं या पैकी जे कमी असेल तितक्या व्यक्तीच्या उपस्थितीस परवानगी राहील.
तसेच खुल्या जागेतील लग्न समारंभाचे आयोजनास जास्तीत जास्त 100 व्यक्तींच्या उपस्थितीस परवानगी राहील. अंत्यविधीस 50 व्यक्तींच्या मर्यादेत परवानगी राहील. स्थानिक स्वराज्य संस्था/ सहकारी संस्थांच्या सर्वसाधारण सभा आयोजनास/ निवडणूकांस निर्बंध असणार नाहीत. सर्व प्रकारचे बांधकाम क्रियाकल्प चालू राहतील.
कृषीविषयक सर्व क्रियाकल्प चालू राहतील. वस्तू व सेवांचे ई-कॉमर्स व्यवहार चालू राहतील. व्यायामशाळा, सलुन, ब्युटीपार्लर, स्पा, वेलनेस सेंटर नियमित वेळेत चालू राहतील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कुठल्याही निर्बंधाविना चालू राहिल. सर्व प्रकारची कार्गो वाहतूक (चालकासह जास्तीत जास्त 3 व्यक्तींसह) चालू राहील.
खाजगी कार/टॅक्सी/बस/दिर्घ पल्ल्याच्या रेल्वे याद्वारे आंतरजिल्हा प्रवासी वाहतूकीस मुभा असेल. तथापि, निर्बंधस्तर 5 मधील क्षेत्रातून सूटणा-या किंवा अशा क्षेत्रात थांबा असणा-या वाहतूकीदरम्यान सर्व प्रवाशांकडे ई-पास असणे बंधनकारक असेल.
सर्व प्रकारची औदयोगिक केंद्रे त्यांच्या नियमित वेळेत चालू राहतील. या आदेशान्वये चालू करण्यात आलेल्या सर्व ठिकाणी कोविड अॅप्रोप्रियेट बिहेवीयरचे (कोविड सुसंगत वर्तणूक) पालन करणे बंधनकारक असेल व याबाबतच्या अंमलबजावणीची जबाबदारी संबंधीत अनुज्ञप्ती प्राधिकारी, स्थानिक प्राधिकरण, पोलीस विभाग, परिवहन विभाग इ. यांची राहील.
शासकीय व खाजगी कार्यालयांमध्ये कोविड अॅप्रोप्रियेट बिहेवीयरची अंमलबजावणीची जबाबदारी संबंधीत विभाग प्रमुखाची राहील, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाद्वारे उपरोक्त आदेश अंमलबजावणी,
जिल्हयाचा कोविड पॉझिटीव्हीटी रेट व ऑक्सिजन बेडवरील रुग्णांचे एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेडशी असलेले प्रमाण याबाबतचा आढावा घेऊन शासनाकडून वेळोवेळी प्राप्त निर्देशान्वये या आदेशामध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यात येईल.
या आदेशामध्ये नमुद नसलेल्या इतर बाबींबाबत या पुर्वीचे आदेश कायम राहतील. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे (SDMA) आदेश प्राप्त झाल्यानंतर स्वतंत्ररित्या आदेश निर्गमित करण्यात येतील, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
कोणतीही व्यक्ती/संस्था/संघटना यांनी उक्त आदेशाचे उल्लंघन केल्यास ते साथरोग अधिनियम 1897 मधील तरतूदीनूसार भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनीय / कायदेशीर कारवाईस पात्र राहतील, याची नोंद घ्यावी.