ताज्या बातम्या

चाळीस वर्षे फरारी आरोपी सापडला, पण…

Ahmednagar News : जिल्हा पोलिस दलातर्फे गेल्या आठवड्यात फरारी आरोपींना अटक करण्यासाठी व्यापक मोहीम राबविली. तब्बल ३५८ आरोपींना शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. यातील एक जण १९८१ मधील गुन्ह्यातील आरोपी आहे.

फरारी आरोपींच्या यादीत नाव असल्याने त्यालाही पोलिसांनी पकडले. मात्र, त्याच्या गुन्ह्याची कागदपत्रे ना पोलिस ठाण्यात सापडली ना न्यायालयात. त्यामुळे आरोपी सापडला असला तरी त्याला अटक करता आली नाही. आता कागदपत्रांची शोध मोहीम पोलिसांनी हाती घेतली आहे.


जिल्हा पोलिस अधीक्षक अधीक मनोज पाटील यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांनी फरारी आरोपींच्या शोधासाठी ९ ते २२ मे या काळात विशेष मोहीम राबविली. यामध्ये ३५८ आरोपींना शोधून काढण्यात आले. यातील एक प्रकरण मात्र वेगळेच असल्याचे समोर आले.

संगमनेर तालुक्यातील सीताराम केशव बर्डे (वय ७२) या आरोपीचे नाव फरारी आरोपींच्या यादीत आहे. त्यामुळे पोलिसांनी त्याला शोधून काढले. त्याच्याविरूद्ध संगमनेर तालुक्यात १९८१ मध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. मात्र, त्या गुन्ह्याची कागदपत्रे पोलिस ठाण्यात किंवा न्यायालयातही उपलब्ध नाहीत.

त्यामुळे त्याला कशाच्या आधारे अटक करायची आणि पुढे कशी कारवाई करायची, हा पोलिसांपुढील प्रश्न आहे. पोलिसांना जुन्या सहकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार या खटल्यातील त्याचे अन्य साथिदार पूर्वीच पकडले गेले होते. त्यातून त्यांची सुटकाही झाली आहे.

हा एक आरोपी तेव्हापासून फरारी होता. आता तो आढळून येत आहे. गुन्हेगारीचा मार्ग सोडून तो गावातच इतर कामे करीत आहे. त्याच्याविरूद्धची कागदपत्रे सापडत नसली तरी पोलिसांच्या यादीवर त्याचे नाव असल्याने त्याला पकडण्यात आले.

आता कागदपत्रांचा शोध सुरू असून तोपर्यंत त्याला गाव सोडून कोठेही न जाण्याची समज देण्यात आली आहे. गुन्ह्याची कागदपत्रे आढळून आल्यावर त्याच्यावर पुढील कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts