अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:- राजकारणापेक्षा समाजकारणाला नेहमी प्राधान्य देणारे गडाख कुटुंब व त्यांचा साधेपणा नेहमीच सर्वसामान्य माणसाला भावला आहे. जनमानसातील नेता म्हणून या कुटुंबाकडे पाहिले जाते. प्रत्येक माणसाला ते आपल्या कुटुंबातील एक सदस्य समजतात. पिढ्यान पिढ्यापासून जपलेली मानसुकीची नाते यामुळे आपल्या वेगळेपणाचा ठसा गडाख यांनी उमटवला आहे.
ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख पाटील यांचा वारसा प्रशांत गडाख हे जपत आहेत. त्यांचे कार्यकर्ते विचाराने झपाटलेले असतात. कोणतेही सामाजिक काम आपल्याच घरचं कार्य असल्यासारखं ते हिरीरिने करतात. त्यात कुठला लोभ नि कुठला स्वार्थ. जे करायचं ते दुसऱ्यांसाठी. असे शेकडो, हजारो कार्यकर्ते यशवंत सामाजिक प्रतिष्ठानसोबत जोडले आहेत. या परिवारात काल दुःखाची घटना घडली. आणि प्रशांत पाटील यांच्या डोळ्यातून अश्रूधारा वाहू लागल्या. भावूक झालेल्या गडाख यांनी आपल्या मित्राबद्दल सोशल मीडियातून भावना व्यक्त केल्या. त्या जशाच्या तशा…
संदिप शानदार गेलास तू… संदिप नियती तुला आमच्यापासुन कायमचचं घेवुन गेली. तुझं आयुष्य तेवढंच होतं. खरंतर तुझ्या मागे कोणीच नाही. म्हणजे ना आई वडील, ना बायको, ना मुलं, तु एकटाचं… पण तु गेल्यानं हजारोंच्या डोळ्यात अश्रु आणलेत, हीच तुझी संपत्ती. मी सोनईत येवुन सामाजिक कार्य सुरु केलं, तेव्हा तु उदय पालवे सोबत दिसायचा, माझ्या सामाजिक कार्यात तु पुढे न येता मागे राहत राबायचा. मी उदय ला नेहमी म्हणायचो, “अरे संदिपचं काय ?” पण उदयने तुला मित्रासारखं, लहान भावासारखं, अगदी मुलासारखं संभाळलं.
एकदा कुठलं इलेक्शन होत माहित नाही पण थोडे वाद झाले आणि तुला एकाने गडाख साहेबांवर खालच्या पातळीवर टिका केलेली सहन झाली नाही आणि तुझा राग अनावर झाला आणि “आता त्याला आम्ही जावुन झोडुन काढतो” असं मला म्हणत होता. मी तुला दराडुन म्हटलं, “संदिप जरा शांत बसं”, तु दहा पावलं मागे होतं लगेच शांत.
मी कधीही उदयच्या कॅण्टीनवर गेलो की तु तिथे हजर राहत असतं. मी तुला फक्त “काय संदिप”, असं म्हणत आणि तु, “काही नाही भाऊ” बसं.. एवढचं आपलं संभाषण. तु चहा आणायचा. कधी कधी मी तुला “बस ना संदिप” म्हणायचो, पण तु “नाही.. नाही..” म्हणत माझ्या मागे काही अंतरावर मी असेपर्यंत तटस्थ उभा असायचा, आज्ञाधारक भावासारखा. मला तुझ्याशी कधी तरी मित्रासारख्या गप्पा माराव्याश्या वाटायच्या, पण तु मर्यादेतच राहिला माझा पाठीराखा म्हणुन.
तु आज आम्हाला रडवतोयस, पण काय शानदार गेलास, हार्टअटॅकने एका क्षणात… न कोणाला त्रास न तुलाही त्रास… खरचं असं मरण आलं पाहिजे रे मित्रा… कॉलेजमध्ये उदयच्या कॅण्टीनच्या परीसरात एक झाड मी लावणार आहे आणि ते झाडचं तुझं कुटूंब समजुन आम्ही सर्व मित्र तुझ्या स्मृती जीवंत ठेवु, बाकी तु काय ठेवलयं आम्हाला करायला…
– प्रशांत गडाख