अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- पाणीपट्टी भरूनही पाणी मिळत नाही, तक्रार केल्यास पाणी येत नाही, तर नळ बंद करून टाका असे वॉलमन उत्तर देतो.
महापौर, नगरसेवकाकडे तक्रार केल्यास काहीच काम होत नाही, मग २ हंडे पाण्यासाठी शेजारी गेल्यास भांडणे करावी लागतात. अशी अवस्था असताना महापालिका प्रशासन आमच्या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत आहे.
दोन दिवसात आम्हाला पाणी न मिळाल्यास ज्याना नळांना जादा पाणी येते, त्या नळांमध्ये सिमेंट घालू. असा इशारा प्रेमदान हडको येथील संतप्त महिलांनी दिला.
शहरातील नवीन प्रेमदान हडको सावेडी परिसरातील महिलांनी मंगळवारी पाणीप्रश्नावर महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सचिन राऊत यांना धारेवर धरत जाब विचारला.
प्रेमदान हडको परिसरात मागील सहा ते सात वर्षापासून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. परिसरातील तीस घरांना पाणीच मिळत नाही, त्यामुळे ज्या नळांना ज्यादा पाणी येते त्या नळांवर पाहण्यासाठी जावे लागते.
तेथे दोन हंडे पाण्यासाठी भांडणे करावी लागतात. यासंदर्भात वारंवार महापालिका पदाधिकारी प्रशासनाकडे तक्रारी करूनही काहीच उपयोग होत नाही.अशी व्यथा या महिलांनी सहाय्यक आयुक्तांसमोर मांडली.