Gold Price Today : रशिया आणि युक्रेन युद्धाचा (Russia and Ukraine war) परिणाम अनेक वस्तूवर होत असताना दिसत आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या खिशाला झळ बसत आहे. आता युद्धाचा परिणाम थेट सोन्यावर देखील होताना दिसत आहे.
जगभरातील बाजारावर युद्धाचा परिणाम होत आहे. युद्धाच्या 14 व्या दिवशी सोने आणि कच्च्या तेलाने विक्रमी पातळी गाठली आहे. सोन्याचा भाव 18 महिन्यांतील उच्चांक ठरला आहे.
चांदीचे भाव 1.8% वाढले
मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर बुधवारी सकाळी सोन्याचा (GOLD) दर 55 हजार रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पुढे गेला आहे. चांदीमध्येही (Silver) वाढ दिसून आली आहे.
MCX वर एप्रिल फ्युचर्स सोन्याचा दर 1.4 टक्क्यांनी वाढला. याशिवाय, चांदीच्या मे फ्युचर्स किमतीत 1.8% ची वाढ झाली आहे.
ऑगस्ट 2020 मध्ये सोने विक्रमी पातळीवर होते
याआधीच्या व्यवहारात सोन्याने 19 महिन्यांचा उच्चांक गाठला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव 2,053.99 डॉलर प्रति औंस राहिला.
स्पॉट सिल्व्हर 1 टक्क्यांनी वाढून $26.66 प्रति औंस झाला. दीड वर्षापूर्वी, ऑगस्ट 2020 मध्ये सोन्याने $2,072 चा विक्रमी स्तर गाठला होता. त्यावेळी देशांतर्गत बाजारात ते 56,200 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहोचले होते.
सोने आणि चांदीच्या नवीन किंमती
बुधवारी, MCX वर एप्रिल फ्युचर्स सोन्याचा भाव 1.4 टक्क्यांनी वाढून 55,190 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. दुसरीकडे, मे फ्युचर्स चांदीचा भाव 1.8 टक्क्यांनी वाढून 72,698 रुपये प्रति किलो झाला. युक्रेनच्या संकटामुळे सोन्याचे भाव आगामी काळात आणखी वाढू शकतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
चांदी 1000 रुपयांनी वधारली
सराफा बाजारात (Bullion Market) सोन्या-चांदीची किंमत जाहीर करणाऱ्या www.ibjarates.com या वेबसाइटनुसार बुधवारी सकाळी 24 कॅरेट सोन्याचा दर 54283 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर पोहोचला.
22 कॅरेट सोन्याचा दर 54066 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे. चांदीच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, 999 शुद्धतेची चांदी सुमारे 1000 रुपयांनी वाढून 71878 रुपये प्रति किलोवर जात आहे.