EPFO : एकीकडे फेसबुक, ॲमेझॉन आणि ट्विटर यांसारख्या दिग्ग्ज कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला आहे तर दुसरीकडे संघटित क्षेत्रातील नोकऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने सप्टेंबरमध्ये 16.82 लाख सदस्य जोडले आहेत. जर मागच्या वर्षीची सप्टेंबर महिन्यातील तुलना केली तर 9.14 टक्क्यांनी हे प्रमाण वाढले आहे.
आकडेवारीनुसार, सुमारे 2,861 नवीन आस्थापनांनी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि विविध तरतुदी कायदा, 1952 अंतर्गत त्यांच्या कर्मचार्यांना सामाजिक सुरक्षा कवच सुनिश्चित करण्यास सुरुवात केली आहे.
हे उल्लेखनीय आहे की सप्टेंबर महिन्यात जोडलेल्या एकूण 16.82 लाख सदस्यांपैकी सुमारे 9.34 लाख सदस्य प्रथमच EPFO च्या कक्षेत आले आहेत.
कामगार मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, नवीन सदस्यांपैकी 2.94 लाख 18-21 वयोगटातील, 2.54 लाख 21-25 वयोगटातील आहेत. म्हणजेच, सुमारे 58.75 टक्के नवीन सदस्य आहेत ज्यांचे वय 18-25 वर्षे आहे.
यावरून असे दिसून येते की प्रथमच नोकरी शोधणारे मोठ्या संख्येने शिक्षणानंतर संघटित क्षेत्राकडे वळत आहेत. यासोबतच देशातील तरुणांना संघटित क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर नवीन नोकऱ्या मिळत आहेत.
तर सप्टेंबर 2022 मध्ये महिला सदस्यांची नोंदणी 3.50 लाख होती. जे गेल्या वर्षीच्या सप्टेंबरच्या तुलनेत 6.98 टक्के अधिक आहे. सप्टेंबर महिन्यात ईपीएफओमध्ये सामील झालेल्या एकूण नवीन सदस्यांपैकी महिला कर्मचाऱ्यांची नोंदणी 26.36 टक्के नोंदवली गेली.
त्याच बरोबर, पेरोल डेटाचे विश्लेषण असे दर्शविते की EPFO च्या कव्हरेजमधून बाहेर पडणाऱ्या सदस्यांच्या संख्येत गेल्या तीन महिन्यांत सातत्याने घट झाली आहे. सप्टेंबर 2022 मध्ये ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सुमारे 9.65 टक्के कमी सदस्य EPFO च्या कक्षेतून बाहेर आले.