ताज्या बातम्या

आनंदाची बातमी : भंडारदरा धरणातून पिण्यासाठी पाणी सोडले

Bhandardara Dam Water : भंडारदरा धरणाच्या लाभक्षेत्रात पिण्याच्या पाण्यासाठी भंडारदरा धरणातून पाणी सोडले असल्याची माहिती धरण शाखेकडून उपलब्ध होत असून भंडारदरा धरणातून १०४० क्युसेकने पाणी सोडण्यात आले आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोटात नुकताच मान्सून दाखल झाला आहे.

तरीसुद्धा भंडारदऱ्याच्या पाणलोटात म्हणावा तसा पाऊस पडताना दिसून येत नाही. पाण्याची आवक अतिशय संथ गतीने सुरू आहे. धरणाच्या लाभक्षेत्रात पावसाचा अनियमतपणा असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत असल्याची माहिती उपलब्ध होत आहे.

नुकतीच पालकमंत्र्यांसमवेत कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. त्यामध्ये शनिवारी भंडारदरा धरणातून पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे भंडारदरा धरणातून शनिवारी सकाळी ११ वाजता १०४० क्युसेकने प्रवरा नदीत पाणी सोडण्यात आले असल्याची माहिती भंडारदरा धरणाचे शाखाधिकारी अभिजीत देशमुख यांनी दिली आहे.

गत २४ तासामध्ये भंडारादरा धरणाच्या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळला असून धरणाचा पाणीसाठा १६३१ दशलक्ष घनफुटावर पोहोचला आहे. धरणात एकूण १०५ दशलक्ष घनफुट नवीन पाण्याची आवक झाली.

शनिवारी दिवसभर भंडारदरा धरणासह पाणलोटात कमी जादा प्रमाणात हलक्या स्वरूपाचा पाऊस कोसळत होता. शनिवारी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत भंडारदरा धरणामध्ये १६५४ दशलक्ष घनफूट पाणी जमा झाले. गत १२ तासांमध्ये ३५ दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक झाली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24
Tags: Bhandardara

Recent Posts