Gopichand Padalkar : सध्या एसटी महामंडळ अनेक अडचणींचा सामना करत आहे. कामगारांचे पगार देखील वेळेवर होत आहेत. असे असताना सरकारचे याकडे लक्ष नाही. यामुळे टीका होत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मोठा आवाज उठवला होता.
आता मात्र ते शांत आहेत. यामुळे आता ठाकरे गटाचे नेते अरविंद सावंत यांनी पडळकरांवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी गोपीचंद पडळकरांचा उल्लेख ‘तमासगीर’ असा केला आहे. “गोपीचंद पडळकर तमासगीर आहे. लाज वाटली पाहिजे.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा तमाशा केला त्यांनी. टाळ काय वाजवतायत? बोलतायत काय? तेव्हा मागणी केली होती की एसटी महामंडळ शासनात विलीन करा. अशीच आहे त्यांची मागणी. आता ते का गप्प आहेत? कारण पगार देता येत नाही, असं अरविंद सावंत म्हणाले आहेत.
तसेच उद्धव ठाकरेंनी महिन्याला ३६० कोटी रुपये महामंडळाला द्यायचा निर्णय घेतला. दिवाकर रावते आणि अनिल परब यांनी आणलेला निधी एसटी महामंडळाच्या इतिहासात सर्वाधिक आहे, हजार कोटी रुपये तर एका वेळी आणले अनिल परब यांनी.
अनेक निर्णय त्या दोघांनी घेतले. मग ही कोण माणस निर्माण झाली ज्यांचा काहीच संबंध नाही? काय बोलतात, जाऊ द्या, असेही अरविंद सावंतांनी यावेळी म्हटले. यामुळे आता एकच चर्चा सुरू आहे. आता पडळकर काय उत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, भाजप नेत्यांनी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एसटी कामगारांचा प्रश्न गंभीर बनला होता. सरकारी कर्मचारी म्हणून सेवाशर्तींचा लाभ मिळावा, महामंडळाला सरकारमध्ये विलीन करावं अशा मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी दीर्घकाळ संप पुकारला होता.
यानंतर सरकारने मध्यस्थी करून वेतनवाढ, वेतनहमी अशा काही उपाययोजना केल्यानंतर संप मागे घेण्यात आला. मात्र, आता पुन्हा काही एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर तेव्हा संपामध्ये सक्रीय दिसणारे गोपीचंद पडळकर चर्चेत आले आहेत.