Rohit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर ७२ तासांमध्ये २ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत आमदारकीचा राजीनामा देण्याचं निर्णय घेत आहे असे म्हंटले आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्यावर मुब्रा पोलीस ठाण्यात महिलेने विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिंदे आणि फडणवीस सरकारवर टीका केली जात आहे. तसेच आव्हाडांना खोट्या गुन्ह्यात गुंतवण्यात येत असल्याचा आरोपही राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात येत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. रोहित पवार यांनी प्रतिक्रिया देताना सरकारवर निशाणा साधला आहे. याबाबत त्यांनी एक ट्विट केले आहे.
रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, “सरकारचं आता अती होतंय! एकदा प्रयत्न करून बघितला पण सत्याचा आवाज दाबता येत नाही म्हणून दुसऱ्या गुन्ह्यात गोवणं हा रडीचा डाव आहे! तक्रारदाराची राजकिय पार्श्वभूमी आणि तो व्हिडिओ बघितला तर कोणतीही महिला भगिनी सांगेन की, सत्य काय आहे?”
छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता’, स्व. अटलजींच्या या ओळी सत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणारे नक्कीच लक्षात घेतील असे पवार म्हणाले आहेत.
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, ज्या कार्यक्रमातील ही घटना आहे, तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अनेक नेत्यांचा कार्यक्रम होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होती. तुम्ही कुठल्याही सर्वसामान्य महिलेला विचारा, त्या व्हिडिओमध्ये काही चुकीचं वाटतंय का?
छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवणारा पिक्चर थांबवल्यामुळे कारवाई झाली होती. त्यावेळी जास्त दिवस जेलमध्ये ठेवता आलं नाही, म्हणून अजून कुठेतरी विषय काढायचा तर या गोष्टी चुकीच्या आहे. संविधानाच्या विरोधात आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय.
छोट्या मनाने अशा पद्धतीच्या कारवाई केल्या जातात. अशा कारवाया असेल तर त्याला विरोध केलाच पाहिजे. केंद्रीय यंत्रांचा वापर करून अनेकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे.
तर राज्य सरकार पोलिसांचा वापर करून नेत्याची बदनामी करत असेल तर याचा निषेध केला पाहिजे, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी व्यक्त केली आहे.