अहमदनगर Live24 टीम, 07 मार्च 2021:- मराठा आरक्षण प्रकरणी सरकार कमी पडतंय. आमचं खरं नुकसान मंत्रिमंडळाच्या उपसमितीचे प्रमुख अशोकराव चव्हाण यांनी योग्य पद्धतीने काम न केल्यामुळे झाले आहे.
असा आरोप अण्णासाहेब फाऊंडेशनचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला आहे. नगर येथे शासकीय विश्रामगृह येथे मराठा आरक्षण व संवाद बैठक घेतली, यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, सभागृहात मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबद्दल चर्चा केली.
मात्र, राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मराठा समाजाबद्दल एक शब्दही काढला नाही. असा आरोप नरेंद्र पाटील यांनी केला . नरेंद्र पाटील म्हणाले, दोन्ही सभागृहाच्या आमदारांनी मराठा समाजाबद्दल वेगवेगळे विषय मांडले. यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तर देणे गरजेचे आहे.
राज्य सरकार मराठा समाजाच्या आरक्षणाच्या दृष्टिकोनातून आज तरी कुठल्या प्रकारे सकारात्मक नसल्याचे चित्र दिसतंय. अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री असून ते किती ताठर आहेत हे आम्हाला माहिती आहे. त्यांनी कुठल्याही मराठा क्रांती मोर्चा लोकांसोबत समन्वय साधलेला नाही.
दि.९ सप्टेंबरला मराठा आरक्षणाला दिलेल्या १२ ते १३ टक्के आरक्षणाला स्थगिती मिळालीय. तसेच नवीन भरती करू नये, या आरक्षणाच्या अंतर्गत त्याला देखील स्थगिती मिळाली. एकंदरीतच काय तर त्यांच्या योग्य पाठपुरावा न झाल्यामुळे मराठा समाजाला बॅकफूटवर यावं लागल्याचा आरोप नरेंद्र पाटलांनी केला आहे.