Grampanchayat Elections : चोवीस तास उलटूनही मिळेनात ग्रामपंचायत उमेदवार याद्या

Grampanchayat Elections : श्रीगोंदा तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया संपून चोवीस तास उलटले असतानादेखील निवडणूक शाखेकडून उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची माहिती न मिळाल्याने श्रीगोंदा महसूल विभागाच्या निवडणूक शाखेचा गलथानपणा पाहायला मिळाला.

तालुक्यातील दहा ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत शुक्रवार दि.२० रोजी सायंकाळी साडेपाच वाजता संपली होती. मात्र, उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने संध्याकाळी ७ वाजेपर्यंत यादी तयार करण्याचे काम सुरू असल्याची माहिती निवडणुक शाखेकडून मिळाली.

मात्र, त्यानंतर एक ते दोन तासांत दाखल उमेदवारी अर्जांची संख्या आणि उमेदवारांची नावे मिळणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात दाखल अर्जांची आकडेवारी मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागली. तर चोवीस तास उलटूनही शनिवारी दि. २१ रोजी सायंकाळपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांच्या नावांची यादी निवडणूक शाखेकडून मिळू शकली नाही.

केवळ दहा ग्रामपंचायतींची निवडणूक हाताळताना महसूलच्या निवडणूक शाखेत गोंधळ उडाला असल्याचे यानिमित्ताने पहायला मिळाले. सोमवार, दि. २३ उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. त्यापूर्वी तरी निवडणूक शाखेची उमेदवारांच्या नावांची यादी मिळणार का? असा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार पंकज नेवसे यांच्याशी वेळोवेळी संपर्क केला असता, त्यांच्याकडून उमेदवारी अर्जबाबत माहिती मिळू शकली नाही. तहसीलदार मिलींद कुलथे हे रजेवर असल्याने अप्पर तहसीलदार हेमंत ढोकले यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी दरदिवशी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची उपलब्ध केली. मात्र, अंतिम उमेदवार यादी देण्यात तेही असमर्थ ठरले असल्याचे दिसून आले.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts